मुंबई : नरिमन पॉइंट ते कांदिवली असा तब्बल ३२ किलोमीटरचा कोस्टल रोड उभारण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने बुधवारी मंजुरी दिली. समुद्रामध्ये भराव घालून हा आठ पदरी रस्ता तयार करण्यात येणार असून त्यावर १२ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. नरिमन पॉइंटपासून प्रियदर्शिनी पार्कपर्यंत बोगदा तयार करण्यात येईल. तेथून हाजी अली-वरळी- वांद्रेमार्गे हा रोड कांदिवलीपर्यंत जाईल. या आठ पदरी मार्गातील एक संपूर्ण रस्ता हा फक्त बससेवेसाठी राखीव असेल. या संपूर्ण मार्गासाठी समुद्राच्या ९० हेक्टर क्षेत्रावर भराव (रेक्लेमेशन) घालण्यात येणार आहे. एका बाजूला चौपदरी रस्ता आणि दुसऱ्या बाजूला चौपदरी रस्ता व मध्ये दुभाजक असा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हे काम केले जाईल. आतापर्यंत सी-लिंकसारखे प्रकल्प समुद्रात पिलर्स टाकून करण्यात आले. मात्र, समुद्रात भराव घालून इतक्या मोठ्या लांबीचा रस्ता निर्माण करण्याचा हा मुंबईतील पहिलाच प्रकल्प असेल. भराव घातलेल्या क्षेत्रात ५० टक्के रस्ता आणि ५० टक्के हरित पट्टा राहील. येत्या सहा महिन्यांत या मार्गाच्या निविदेची प्रक्रिया पूर्ण करून बांधकामास सुरुवात करायची आणि २०१९ पर्यंत तो पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)मुंबईच्या वाहतुकीत आमूलाग्र क्रांती घडवून आणेल अशा या कोस्टल रोडला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचे मी विशेष आभार मानतो. मुंबईकरांचे एक स्वप्न त्यामुळे सत्यात उतरणार आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीकोस्टल रोडचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असेल. या रोडमुळे मुंबईसाठी वाहतुकीचा पाचवा कॉरिडॉर खुला होणार आहे. २०१९ पर्यंत हा रोड पूर्ण करण्याचा मानस आहे.- अजय मेहता, आयुक्त, मुंबई महापालिका
मुंबईच्या कोस्टल रोडला केंद्राची मंजुरी
By admin | Updated: December 31, 2015 04:23 IST