अझहर शेख
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ७ - दहशतवादी संघटना पोसणारा इस्त्राईल मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद, इस्लाम जिंदाबाद, भारत जिंदाबाद...भारत की एकता हमेशा रहेगी बरकरार, अशा घोषणा देत शेकडो मुस्लीम नाशिककरांनी शहाजहांनी ईदगाहवरून अवघ्या देशाला नव्हे तर जगाला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. वरुणराजाच्या साक्षीने रमजान ईदचा दिमाखदार पारंपरिक सोहळा संपन्न झाला.रमजान पर्वचे तीस उपवास (रोजे) पूर्ण करत मुस्लीम बांधवांनी गुरूवारी (दि.७) सकाळी दहा वाजता रिमझिम पावसात ईदचे विशेष नमाजपठण सामुदायिकरित्या केले. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये नमाजपठणाचा सोहळा यशस्वीरित्या शांततेत संपन्न झाला. या वर्षीच्या नमाजपठण सोहळ्याचे आगळे वैशिष्ट होते ते म्हणजे प्रारंभी व समारोपादरम्यान शेकडो नागरिकांनी सुरूवातीलाच आतंकवादाचा निषेध नोंदविला तसेच भारतीय एकता व अखंडतेचा विश्वास अधिक दृढ केला. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे शहर असलेल्या मदिनामध्ये दोन दिवसांपुर्वी झालेल्या दुर्घटनेची सौदी सरकारने सखोल चौकशी करत सत्त्य जगापुढे मांडावे, यासाठी भारतीय तपास यंत्रणेचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवावा, असे आवाहन सय्यद मीर मुख्तार यांनी उपस्थितांच्या वतीने ध्वनिक्षेपकांवरुन केले.
दहा वाजता नमाजपठणाला सुरुवात झाली. प्रारंभी खतीब यांनी उपस्थितांना नमाजपठणाची पध्दत सांगितली. त्यानंतर नमाजपठणाला प्रारंभ करण्यात आला. वीस मिनिटांमध्ये नमाजपठणाचा सोहळ्याची सांगता झाली. दरम्यान, खतीब यांनी ईदच्या पावन दिवसाच्या औचित्यावर शेकडो नागरिकांच्या उपस्थित सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. उपस्थितांनी प्रार्थनेला ‘आमीन’ म्हणत प्रतिसाद दिला. सोहळ्याची सांगता सामुहिक दरुदोसलामच्या पठणाने करण्यात आली.