अनिकेत घमंडी,
डोंबिवली- केडीएमसीच्या एमआयडीसीतील क्रीडा संकुलातील जलतरण तलावात आठ वर्षांपासून कार्यरत असलेले जीवरक्षक आणि प्रशिक्षक यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत तातडीने कंत्राटदाराशी चर्चा केली जाईल, अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. तसेच त्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव आयुक्त ई. रवींद्रन मंजुरीसाठी सरकारकडे पाठवणार आहेत, अशी माहिती आमदार रवींद्र चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.जलतरण तलावातील प्रश्नांची मालिका ‘लोकमत’ने मांडली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमावेळी आमदार व महापौरांची भेट घेतली. तेव्हा उभय नेत्यांनी ही माहिती दिली. पालिकेतील सभागृह नेते राजेश मोरे यांनीही तलाव व क्रीडा संकुलाची पाहणी केली होती. या वेळी या कर्मचाऱ्यांना कायम नोकरीत सामावून घेण्यासाठी महासभेत चर्चा झाल्याचे सांगितले. अत्रे व सावित्रीबाई फुले रंगमंदिरांतील कर्मचाऱ्यांचीही समस्या सारखीच आहे. त्यांचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सरकारकडे पाठवण्यास महासभेने मंजुरी दिली आहे. त्याच पद्धतीने या कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक विचार व्हावा. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निकषांची तपासणी करून प्रस्ताव सरकारकडे पाठवता येतील. याबाबत, रवींद्रन यांच्याशी चर्चा झाली आहे. आयुक्त पुढील कार्यवाही करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर यांनीही कंत्राटदाराशी चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या मानधनात सर्वसमावेशक मानधन देण्यासंदर्भात स्थायीच्या सदस्यांशी चर्चा तसेच महापौरांशी बोलून महासभेत हा विषय पटलावर घेण्याचे आश्वासन दिले. मानधनात वाढ करणे तसेच त्यांना कायम तत्त्वावर रुजू करून घेण्यासंदर्भात योग्य ती प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासनही देवळेकर यांनी दिले.