सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामातील ३१ कोटी रुपयांची ऊसबिले दिली नसल्याने साखर आयुक्तांनी या कारखान्याचा यंदाच्या हंगामाचा परवाना रोखला आहे. शेतकऱ्यांचे थकीत बील दिल्यानंतरच परवाना देण्यात येईल, असे आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे कारखान्याचा यंदाचा हंगाम सुरू होण्यात अडचणी निर्माण झाल्या असून, कार्यक्षेत्रातील उसाच्या गाळपाचा प्रश्न गंभीर बनला आहे.वसंतदादा कारखान्याकडे शेतकऱ्यांची ऊसबीले, जिल्हा बँक आणि व्यापाऱ्यांची देणी थकली आहेत. कारखान्याने ही देणी भागवण्यासाठी २१ एकर जागा विक्रीला काढली आहे. मात्र विक्री प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे ऊसबिले अद्यापही दिलेली नाहीत. त्यामुळे कारखान्याच्या यंदाच्या हंगामाबाबत उलट-सुलट चर्चा रंगू लागली. मात्र कारखान्याने गळीत हंगामाची पूर्ण तयारी केली. १० नोव्हेंबरला बॉयलर पेटवण्यात आला.तथापि, कारखान्याने मागील हंगामातील ऊसबीले दिली नसल्याबाबत शेतकरी संघटनेने पुणे येथील साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन साखर आयुक्तालय येथील प्रादेशिक सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी यंदाच्या गळीत हंगामाचा कारखान्याचा परवाना रोखला आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना शेळके म्हणाले की, वसंतदादा कारखान्याने २०१४-१५ वर्षातील गाळप परवान्यासाठी अर्ज केला होता. परंतु, त्यांनी शेतकऱ्यांची बिले दिलेली नाहीत, अशा तक्रारी होत्या. वस्तुस्थिती पाहिली असता त्यास दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे अद्यापि कारखान्यास गाळप परवाना दिलेला नाही. सर्व बिले भागविल्याचा दाखला दिल्यास त्यांना परवाना मिळू शकतो.याबाबत कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)
‘वसंतदादा’चा गाळप परवाना रोखला
By admin | Updated: November 18, 2014 02:09 IST