मुंबई : मानसिक आणि शारीरिक असा सर्वांग व्यायाम समजल्या जाणाऱ्या योगासनांचे महत्त्व आता जागतिक पातळीवर अधोरेखित झाले आहे. सध्या २ लाख ९२ हजार कोटी रुपयांची असलेल्या योगासनांच्या जागतिक मार्केटमध्ये २०२७ पर्यंत तब्बल ५ लाख १४ हजार ५७२ कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज फिटनेस क्षेत्रातील एका सर्वेक्षण कंपनीने वर्तविला आहे. २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाल्यानंतर भारतामध्ये देखील योगासनांच्या बाजारात लक्षणीय उलाढाल होत असून, सद्य:स्थितीत भारतीय योगासनांच्या मार्केटमध्ये २९,५०० कोटी रुपयांच्या उलाढालीची नोंद झाली आहे. भारतात किंवा जगात होणाऱ्या योगासनांच्या आर्थिक उलाढालीमध्ये योग प्रशिक्षणाचे कोर्स, योग स्टुडिओ, योगासन शिकण्यासाठीचे शुल्क आदी मुद्दे विचारात घेतले आहेत. तसेच अलीकडे संपूर्ण जीवनशैली पॅकेज हे प्रकार वाढत आहेत.
शिक्षकांची कमतरतायाेग शिक्षकांची संख्या तीन लाखांच्या आसपास असून, योगासन शिकण्याकडे लोकांचा वाढता कल लक्षात घेता २०२५ पर्यंत भारताला आणखी किमान दोन लाख योग शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे.
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे योगासनासंदर्भात योग ट्रेनर आणि योग थेरपी असे दोन प्रकारचे शिक्षण दिले जाते. यामधे विविध पातळ्या असून, याच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात. याद्वारे योगासनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाते. - रचना साठे, योगाचार्य
योग हा अष्टपैलू व्यायाम आहे. हटयोग या शब्दामध्ये ‘हट’चा अर्थ ‘बल’ असा होतो. हटयोगामध्ये अनेक शारीरिक आसन आणि स्थिती यांचा समावेश असतो, जे शरीर आणि मन संतुलित करतात. आसनांचा नियमित सराव केल्याने स्नायूंची क्षमता वाढतानाच शरीर निरोगी व कार्यक्षम होते. योग करताना श्वासाबद्दल जागरुक असणे अपेक्षित असते. त्यामुळे शारीरिक व्यायाम होत असताना त्याबरोबरच मानसिक आरोग्यही सुधारायला मदत होते.- शिल्पा कुलकर्णी-मोहिते, योगगुरू, दुबई