मुंबई : राज्यातील वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनींवर अतिक्रमण केलेल्यांना वक्फ अधिनियमानुसार रीतसर भाडेपट्टा करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, जे अतिक्रमणधारक वक्फ बोर्डाचे भाडेकरू होणार नाहीत, त्यांच्यावर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून ‘बुलडोझर’ कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेसोबत वक्फ बोर्डातर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे. ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण मुंबईत २०० पेक्षा जास्त मालमत्ता वक्फच्या मालकीच्या असून त्यावर इमारती उभारल्या. ज्यांनी अनधिकृत पद्धतीने ना-हरकत प्रमाणपत्र मिळवले, त्यांची चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर अशा अनधिकृत नाहरकत प्रमाणपत्र घेतलेल्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘जीआयएस’द्वारे आढावाराज्यात वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनींची स्थिती जाणून घेण्यासाठी जीआयएस मॅपिंग करून त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. वक्फच्या माध्यमातून ५० महिला व ५० विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचा धनादेश देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बोर्ड प्रयत्न करणार आहे.