अझहर शेख/ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 13 - जोरदार पावसामुळे दोन वर्षानंतर प्रथमच गेल्या रविवारी (दि.१०) गोदामाईला पूर आला होता. या पुरात तपोवनातील नदीपात्रावरील लोखंडी पूल धोकादायक बनला आहे. या पूराचे संरक्षक कठडे पाण्यात वाहून गेले आहे. या पूलावरुन भाविक रामटेकडीकडे जातात. नदीपात्र ओलांडताना पुलाचा वापर भाविकांकडून केला जात असला तरी हा पूल धोक्याचा ठरत आहे. कारण नदीपात्राच्या पाण्याची पातळी वाढली असून पुलाची दुरवस्था झाल्याने पूलावरून मार्गक्रमण करणे नागरिकांनी थांबविणे गरजेचे आहे. पुराच्या पाण्याने पूल धोकादायक झाला असला तरी महापालिका प्रशासनाने अद्याप या ठिकाणी कुठलाही सावधानतेचा इशारा देणारा फलक लावण्यात आलेला नाही. तसेच पूलही बंद करण्यात आलेला नाही. पावसाळ्यात हा पूल बंद ठेवावा किंवा पूलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.या धोकादायक पूलाच्या मध्यभागी येऊन तरुण-तरुणी सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असल्याने धोका वाढला आहे.