ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 7 - मित्रांसोबत खेळताना नाल्यात उतरलेला 14 वर्षीय मुलगा पाण्याच्या प्रवाहासोबत ड्रेनेज चेंबरमध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी पावणेअकराच्या दांडेकर पुलाजवळील अंबिल ओढा नाल्यामध्ये हा मुलगा वाहून गेला आहे. अग्निशामक दल आणि सांडपाणी विभागाकडून मुलाचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत दुपारपर्यंत मुलाचा शोध लागू शकलेला नव्हता.
गणेश किशोर चांदणे (वय 14, रा. दांडेकर पुल वसाहत) असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश त्याच्या मित्रांसह नाल्यामध्ये खेळत होता. त्यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. पाय घसरल्यामुळे खाली पडलेला गणेश प्रवाहासोबत वाहत चेंबरपर्यंत गेला. चेंबरला पडलेल्या मोठ्या भगदाडामधून तो खाली पडला. ड्रेनेज पाईपमधून तो वाहत गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तीन बंब, जेसीबी आणि आधुनिक साधनांच्या सहाय्याने त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे.