सावधान...बाटलीतले पाणी शुद्ध नव्हे, तर प्लॅस्टिकयुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 06:44 AM2019-08-28T06:44:08+5:302019-08-28T06:45:10+5:30

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल : राज्यात दररोज पाण्याच्या लाखो बाटल्यांची विक्री

Bottled water is plastic mix | सावधान...बाटलीतले पाणी शुद्ध नव्हे, तर प्लॅस्टिकयुक्त!

सावधान...बाटलीतले पाणी शुद्ध नव्हे, तर प्लॅस्टिकयुक्त!

Next

औरंगाबाद : शुद्ध समजून २० रुपयांत लीटरभर पाणी खरेदी करून ते पीत असाल, तर सावधान! पाण्यासोबत तुम्ही प्लॅस्टिकही पोटात घेत आहात. या पाण्यातील मायक्रोप्लॅस्टिकचे प्रमाण वाढले असल्याचा धक्कादायक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास दररोज लाखो लीटर बाटल्यांचे पाणी माणसाच्या पोटात जात असल्याची माहिती ‘लोकमत’ने मिळविलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला प्लॅस्टिकमुक्त करण्याची घोषणा जी-७ परिषदेत केली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचा हा १२४ पानांचा अहवाल महत्त्वाचा ठरतो. बाटल्यांतील पाण्यात मायक्रोप्लॅस्टिकचे प्रमाण वाढले असल्याचे अहवालात म्हटले आहे. याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर काय होतो, यासंदर्भात ठोस काही हाती लागलेले नाही. यासाठी यावर आणखी काम करण्याची गरज असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. मायक्रोप्लास्टिक म्हणजे साधारण पाच मिलिमीटर आकार असलेले प्लास्टिकचे हे कण असतात. पिण्याच्या पाण्यात तर हा आकार एक मिलिमीटर इतकादेखील असू शकतो. प्रत्यक्षात एक मिलिमीटरपेक्षा छोट्या कणांना नॅनोप्लास्टिक म्हटले जाते. यामुळे माणसाला धोका पोहोचतोच असेही नाही. मात्र, यावर आणखी अभ्यास करण्याची गरज आहे.


मायक्रो प्लास्टिक आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यावर तातडीने अभ्यास होण्याची गरज आहे. कारण जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पिण्याच्या पाण्यात या मायक्रोप्लास्टिकचा अंश आहे. यासोबतच आम्हाला प्लास्टिक प्रदूषणात होणारी वाढ रोखण्याची गरज आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रमुख मारिया नीरा यांनी सांगितले.


200 कोटी लोकांना जगभरात दूषित पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पाण्यातील मायक्रोप्लॅस्टिकपेक्षाही पाण्यातील जीवाणू-विषाणूला दूर करण्यासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
4,85,000
लोकांना जगभरात २०१६ सालात दूषित पाण्यामुळेच आपला जीव गमवावा लागला आहे.



मायक्रोप्लॅस्टिकचा धोका काय?
मायक्रोप्लॅस्टिक आरोग्याला थेट हानिकारक नसले तरी प्लॅस्टिकमधील रसायन हानिकारक ठरू शकते. मायक्रोप्लॅस्टिकच्या मदतीने रोगनिर्मिती करणारे जीवजंतूदेखील शरीरात सहजतेने पसरू शकतात,
असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
काय करायचे?
पाण्यावर प्रक्रिया करून हे मायक्रोप्लॅस्टिक ९० टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकते. सरकार व लोकांनी प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी कसा होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेनेच म्हटले आहे.

Web Title: Bottled water is plastic mix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.