ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 5 - मुंबईत महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक भाजपा लढवणार नाही अशी भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुगली टाकल्यानंतर भाजपाला पाठिंबा देणाऱ्य़ा अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी स्थायी समितीत बसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापौरपदाच्या स्पर्धेतून भाजपने बिनशर्त माघार घेतली असली, तरी आपणच स्थायी समितीत बसणार, असा विश्वास अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात मिळालेल्या आश्वासनांमुळे गीता गवळी यांच्याकडे सर्वांचेच लक्ष होतं. त्यावरुनच त्यांनी आपली भूमिका मांडताना स्थायी समितीत आपल्याला नक्की स्थान मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय शिवसेनेकडून बोलावणं आलं, तर आपण चर्चेसाठी तयार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या प्रश्नावर गीता गवळी म्हणाल्या की, शिवसेनेसोबत गवळी परिवाराचे चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरेंचा मी नेहमी आदर करते. त्यामुळे शिवसेनेसोबत मी आधीपासूनच होते, आणि आताही असणार आहे.विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुक्तकंठाने स्तुती केली. भाजपचा माघार घेण्याचा निर्णय योग्यच असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मारलेला हा सिक्सर आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. शिवाय मुख्यमंत्र्यांनी स्थायी समिती सदस्यपदाबाबत जो शब्द दिला आहे, तो ते नक्की पाळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
BMC Election 2017 : तरीही मी स्थायी समितीत बसणार - गीता गवळी
By admin | Updated: March 5, 2017 17:44 IST