राज्यात अनेक वर्षांपासून प्रशासक असलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. राज्यभर राजकीय हालचाली, पक्षप्रवेश वाढले आहेत. सर्वच पक्षांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली असून, भाजपने आपल्या माजी खासदार आणि आमदारांची एक बैठक मुंबईमध्ये बोलावली होती. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भातील रणनीतीवर चर्चा झाली. यात माजी खासदार-आमदारांवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माजी आमदार-खासदारांची बैठक बोलावली होती. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, संजय केनेकर, माधवी नाईक, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे याची प्रमुख उपस्थिती होती.
पक्षाचे सर्व माजी खासदार आणि आमदार या बैठकीस हजर होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती आखण्यासाठी, संघटनात्मक स्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.
बूथस्तरापासून मतदान केंद्रांपर्यंतची मोर्चे बांधणी, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, संपर्क मोहिमा यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणे, जनसंपर्क आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली.
माजी खासदार,आमदारांवर कोणती जबाबदारी?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 'आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाच्या प्रत्येक माजी खासदार आणि आमदाराने पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील एक -एक मंडल दत्तक घ्यावे', अशी सूचना त्यांनी उपस्थित माजी खासदार आणि आमदारांना केले.