ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करून त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या विरोधावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ' पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांच्या कार्यक्रमाला शिवेसेनेने केलेला विरोध हा भाजपाला झुंडशाही वाटली होती, मग सबनीसांच्या तंगड्या तोडण्याची भाषा करत भाजपा कार्यकर्त्यांनी केलेला विरोध हा म्हणजे झुंडशाहीचे श्रीखंडी स्वरूप आहे का?' असा सवाल उद्धव यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून विचारला आहे. तसेच गुलाम अली व कसुरीप्रमाणे मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष सबनीस यांच्या च्या तंगड्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आता मुख्यमंत्र्यावर आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. या लेखातून त्यांनी सबनीसांवरही टीकास्त्र सोडले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात?
- नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी काही मुक्ताफळे उधळली आहेत व त्या विरोधात भारतीय जनता पक्षाने संमेलनाचे मैदान उखडण्याची धमकी दिली आहे. पिंपरी-चिंचवडमधील अखिल भारतीय मराठी संमेलन कसे होते ते पाहू. संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या तंगड्या वगैरे मोडून हातात देण्याची भाषा पुणे व परिसरातील भाजप खासदारांनी केली आहे. संमेलनाध्यक्ष सबनीस यांनी साहित्याबाहेरच्या विषयांवर स्वत:ची मते मांडली. हे त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकते. पण त्यांचे थोडे चुकले ते असे की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला. मोदी पाकिस्तान भेटीवर असताना त्यांच्यावर हल्ला झाला असता तर पाडगावकरांच्या आधी मोदींना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आपल्यावर आली असती असे सबनीस यांनी म्हटले. तसेच गोध्रातील मोदी हे कलंकित असल्याचे मत त्यांनी मांडले. भारतीय जनता पक्षाच्या मंडळींचे पित्त त्यामुळे खवळले आहे. सबनीस यांना जे सांगायचे ते परखडपणे, पण सभ्य भाषेत त्यांना मांडता आले असते. मात्र आडात नाही तर पोहर्यात कुठून येणार?
- मुळात विद्यमान साहित्य संमेलनाध्यक्ष हे साहित्यिक, लेखक, कवी, नाटककार वगैरे नसून ते एक समीक्षक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा करणे योग्य नाही. पंतप्रधान म्हणून देवगौडा यांच्याकडून फार अपेक्षा करता येत नव्हत्या तसेच सबनीसांच्या बाबतीत म्हणावे लागेल. मोदी कलंकित आहेत की नाहीत हे न्यायालयाने ठरवायचे आहे, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी नव्हे. मोदी यांचे पाकिस्तानात जाणे हा वादाचा विषय आहे, मात्र तेथे त्यांच्या जीवाला धोका झाला असता असे सबनीस कोणत्या आधारे म्हणत आहेत? कारण सुरक्षेची संपूर्ण खात्री असल्याशिवाय हिंदुस्थानचे पंतप्रधान पाकिस्तानात उतरले नसावेत. तुर्कस्तानात जीवास धोका असल्याची कुणकुण लागताच पंतप्रधान मोदी यांना इस्रायलच्या ‘मोसाद’चे सुरक्षा कवच दिले होते हे लक्षात घेतले पाहिजे. मोदी हे पाकिस्तानातून सुरक्षित परतले. श्रीपाल सबनीस यांना प्रत्येक घटनेवर मत मांडण्याचा अधिकार आहे तसा या विषयावरही आहे. मात्र आपण राजकीय पक्षाचे टोळीप्रमुख नसून मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहोत याचे भान त्यांनी ठेवायला हवे होते. वास्तविक, आपल्या साहित्य विश्वात दुष्काळ पडला आहे व आंब्याचा मोहोर वठून झाडावर किडकी बोरे लागली आहेत असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.
- सबनीस यांच्या मोदी टीकेनंतर भाजपचे पित्त खवळले व आता सबनीस यांच्या तंगड्यांचे काय होणार? हा प्रश्न साहित्य संमेलनाच्या संयोजकांना पडला आहे. आम्हाला आश्चर्य वाटते ते याचे की, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांच्या मुंबई भेटीस शिवसेनेने विरोध केला व कसुरी यांच्या निमित्ताने पाकड्यांना पायघड्या घालणार्याचे तोंड काळे केले त्यावेळी शिवसेनेने हे कसे केले, ही तर झुंडशाही झाली, हे सहन करणार नाही, अशी मुक्ताफळे भाजपने उधळलेली होती. मुख्यमंत्र्यांनी पाकड्यांच्या संरक्षणासाठी कंबर कसली होती. आम्ही तर देशावर आक्रमण करणार्या व हिंदुस्थानचे तुकडे पाडण्याचे स्वप्न पाहणार्या पाकिस्तानी लोकांना विरोध केला. ती भाजपला झुंडशाही वाटली, मग सबनीस यांच्या निमित्ताने जे सुरू आहे ते झुंडशाहीचे श्रीखंडी स्वरूप आहे काय?
- गुलाम अलीसारख्यांना संरक्षण देण्यासाठी आकाशपाताळ एक करू असे महाराष्ट्राचे सरकार सांगत होते व गुलाम अलीस पळवून लावल्याचे दु:ख दिल्लीश्वरांनाही झालेच होते. शिवसैनिकांनी काही कुणाच्या तंगड्या वगैरे तोडून हातात देण्याची भाषा केली नव्हती. देशाच्या दुश्मनांना येथे पायघड्या घातल्याचा तो संताप होता. आता सबनीस यांच्याबाबतीत भाजप तेच करीत होते. फरक इतका की, आम्ही देशप्रेमासाठी केले व भाजप मोदीप्रेमासाठी करीत आहे. तरीही गुलाम अली व कसुरीप्रमाणे मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांच्या तंगड्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे. आई जगदंबे, सबनीसांच्या तंगड्यांचे रक्षण कर.’