जामखेड (जि.अहमदनगर) : राज्यातील सत्ता बदलात आमच्या मित्रपक्षाचा सिंहाचा वाटा आहे, परंतु भाजपाला याचा विसर पडला आहे. त्यांना सत्तेचा गर्व चढला आहे. आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही आमची औकात काढू नका. तुमची जिरवण्यासाठी आम्ही सत्तेची झूल फेकून देऊ,अशी टीका राज्याचे दुग्धविकासमंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली. खर्डा (ता.जामखेड) येथे बुधवारी राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसंग्राम उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ जानकर यांनी नारळ वाढवून केला. त्यानंतर, आयोजित सभेत ते बोलत होते. मंत्री जानकर म्हणाले, ‘आमचे दैवत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आम्ही भाजपासोबत आहोत. ते नाहीत म्हणून आमची परवड करू नका. मी २३ वर्षांपासून संघर्ष करतो आहे. चळवळीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. मी ब्रह्मचारी आहे. मला कशाची हाव नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत. भ्रष्ट काँग्रेस, राष्ट्रवादी नको, म्हणून तुम्हाला जवळ केले. माझा पक्ष राज्यातच नव्हे, तर देशात आहे. आमचा मान ठेवा. सात महिन्यांपूर्वी मंत्रिपद घेतले. मी शेतकऱ्यांचा कैवारी असल्याने दुधाचे दर वाढवले. सातत्याने तोट्यात असलेला मत्स्यविभाग साडेसात कोटी रुपयांनी नफ्यात आणला आहे,’ असा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
भाजपाला सत्तेचा गर्व, आमची औकात काढू नका - जानकर
By admin | Updated: February 9, 2017 00:27 IST