नाशिक : आगामी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करून भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्यातच ठाणे येथे शिवसेना उमेदवाराला मदत करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी धाव घेतल्याने त्याची भरपाई म्हणून नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला मदत करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झाल्याचे वृत्त आहे.ठाणे येथील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना विजयी करण्यासाठी तसेच दगाबाजी नको म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या नगरसेवकांसह अन्य मतदारांना शिवसेनेला मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळेच वसंत डावखरे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक विजयी झाले होते. आता राज्यात नाशिकसह अमरावती येथील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात भाजपाच्या वतीने नाशिकमधून डॉ. प्रशांत भामरे यांना, तर अमरावतीतून विद्यमान गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ तसे पाहिले तर भाजपाच्या ताब्यात राहिलेला मतदारसंघ आहे. मागील वेळी तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचे शालक डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळून ते विजयी झाले. तत्पूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व प्रताप सोनवणे व त्यापूर्वी ना. स. फरांदे यांनी केले आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा असली तरी अद्याप तांबे यांना अधिकृत उमेदवारी करण्यास विलंब होत आहे.शिवसेनेनेही भाजपाला विरोध म्हणून पदवीधर मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याची तयारी केल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात शिवसेनेकडे पदवीधरसाठी अद्याप तरी कोणी तयारी दर्शविली नसल्याचे सेनेच्या एका नेत्याने खासगीत बोलताना सांगितले; मात्र काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या एका माजी नेत्याने शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले होते. (प्रतिनिधी)
भाजपा ठाण्याची भरपाई नाशिकला मागणार?
By admin | Updated: August 17, 2016 04:52 IST