पिंपरी-चिंचवड : भाजपाचा विस्तार करण्यासाठी विरोधकांना आम्ही गुणदोषांसह स्वीकारतो. अगदी गुन्हेगार असला तरी पक्षाच्या परीसस्पर्शाने वाल्याचा वाल्मिकी होतो, असे विधान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केले. भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचे उद्घाटन गडकरींच्या हस्ते झाले. गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देण्याचे समर्थन करताना गडकरी यांनी नागपूर येथील एका कार्यकर्त्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, एकेकाळी कुप्रसिद्ध असलेला हा कार्यकर्ता पक्षात आल्यानंतर चांगला झाला. त्यामुळे आम्ही गुणदोषांसह नवीन कार्यकर्त्यांना स्वीकारतो. पण गेल्या ४० वर्षांच्या राजकारणात कधीही गुन्हेगारांची बाजू घेतलेली नाही. आता जुन्या कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. त्यांनी नवीन कार्यकर्त्यांचा मोठ्या मनाने स्वीकार केला पाहिजे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या पक्षात आल्याशिवाय आपला पक्ष वाढणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. विरोधकांना बरोबर घेऊन आपल्यासारखे बनविले पाहिजे, असा सल्लाही गडकरींनी पदाधिकाऱ्यांना दिला....त्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत -राज्यात ३६ हजार कोटींचे सिंचनाचे प्रकल्प सुरू आहेत. ५० टक्के शेती सिंचनाखाली आल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. गेल्या ३० वर्षांत सत्ता असूनही विरोधकांना सिंचन क्षेत्र वाढविता आले नाही. शेतकऱ्यांऐवजी त्यांनी परिवाराचा विचार केला. येत्या दोन वर्षांत विकास दर २० टक्के करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
भाजपात वाल्याचा वाल्मिकी होतो
By admin | Updated: April 27, 2017 02:14 IST