BJP Shivendrasinh Raje Bhosale News: महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. बीड, परभणी, लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, आनंदाचा शिधा योजना, अशा अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. विरोधी पक्षाचे सदस्य तुलनेने अत्यल्प असले तरी सत्ताधाऱ्यांना चांगलेच तुल्यबळ ठरताना दिसत आहेत. विविध मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुतीतील छुप्या संघर्षाचा पूरेपूर फायदा विरोधक करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी विरोधकांना खरपूस शब्दांत उत्तर दिले.
गेल्या काही वर्षांत झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनात बहुतांश वेळा मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातो. अनेकदा सत्ताधारी पक्षाचे सदस्यही याबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधित मंत्र्यांकडून उत्तरे घेत असतात. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात ठाकरे गटाचे सदस्य भास्कर जाधव यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नाला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उत्तर दिले.
महाराष्ट्रात छत्रपतीच घाबरायला लागले, तर अवघड होईल
मला व्हॅनिटी व्हॅनची गरज नाही. माझी स्वतःची कार आहे. यातून फिरण्याची माझ्यात ताकद आहे. मी स्वतः या महामार्गाची पाहणी संबंधित लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन केली. भास्कर जाधव यांनाही त्या वेळी भेटायचे होते. यामध्ये घाबरण्यासारखा विषय नाही. महाराष्ट्रात छत्रपतीच घाबरायला लागले, तर अवघड व्हायचे, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई-गोवा हायवेचे २०११ पासून काम सुरू आहे. या कामास विलंब झाला आहे. कोकणातील बरेच लोक मुंबईस वास्तव्यास असून त्या ठिकाणी नोकरी-व्यवसाय करत आहेत. त्यांच्या दृष्टीने हा महामार्ग महत्त्वाचा ठरतो. राज्याच्या विकासात या महामार्गाचा मोठा वाटा आहे. जानेवारी २०२६ अखेरपर्यंत या पुलाचे काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिली.