लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी काँग्रेस आणि बहुतांश विरोधी पक्षांची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचे संयोजक आणि जागावाटपाबाबत चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदाचे अनेक उमेदवार समोर आले आहे. तसेच राज्यपातळीवरही वर्चस्व राखण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. तसेच इंडिया आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत अंदाज लावले जात आहेत. याच दरम्यान भाजपाने पुन्हा एकदा यावरून निशाणा साधला आहे.
"भाजपा विरुद्ध दंड थोपटून उभी असलेली घमेंडीया टोळी म्हणजे मोठं घर पोकळ वासा" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा महाराष्ट्रने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "इनको लोगो की परवाह नही हैं, logo की परवाह है" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. "घमंडिया टोळीला फक्त स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा विकास करायचा" असं म्हणत भाजपाने टीका केली आहे.
"भाजप विरुद्ध दंड थोपटून उभी असलेली घमेंडीया टोळी म्हणजे मोठं घर पोकळ वासा असल्यासारखं आहे. या सगळ्यांना राष्ट्र, राष्ट्रप्रेम, लोककल्याण याच्याशी काहीही घेणंदेणं नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. यांच्यामध्ये असलेली घमेंड परत एकदा दिसून आली. या लोकांमध्ये I.N.D.I.A च्या लोगोवरून वाद निर्माण झाला आणि आज त्यांच्या लोगोचा अनावरण सोहळा पुढे ढकलण्यात आला. "इनको लोगो की परवाह नही हैं, logo की परवाह है"" असं भाजपाने म्हटलं आहे.
"घमंडिया टोळीला फक्त स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा विकास करायचा आहे. त्यांच्या डोळ्यात भारतीय जनता पक्षाने सुरू केलेली विकास कामे आणि भारताची प्रगती खुपत आहेत. पण दुसरीकडे भारतीय जनतेलाच नाही तर संपूर्ण जगाला मोदीजींच्या कर्तृत्वावर आणि नेतृत्वावर विश्वास आहे" असं देखील भाजपाने म्हटलं आहे.