संजय नेवे,
विक्रमगड- विक्रमगड नगरपंचायतची निवडणुक २७ नोव्हेंबरला जाहिर झाली असून सर्वपक्षीयांनी आता पासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. या पूर्वी ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षे भाजपची एकाहती सत्ता होती. परंतु गेल्या अनेक दिवसापासून सर्वच संघटना व राजकीय पक्ष भाजपाला शह देण्यासाठी एक होतील असे एकंदरीत चित्र आहे. या नगरपंचायतीची एकूण लोकसंख्या ८ हजार ३४० एवढी आहे. त्यापैकी अनुसुचित जमातीची ५ हजार ३६३, अनुसुचीत जाती ची १७३ आणि इतर २ हजार ८०४ अशी लोकसंख्या आहे एकुण १७ प्रभाग असल्याने प्रत्येकाच्या मतदारसंघात अंदाजे २०० ते ३०० मतदार हे उमेदवाराचे भवितव्य ठरविणार आहेत. या नगरपंचायत पंचायतमध्ये अनुसुचित जमातीच्या ११ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. मागासवर्गातील ५ जागा व १ जागा सर्वसाधारण निश्चित करण्यात आली असली तरी या सर्वसाधारण जागेवरच मोठया प्रमाणात रस्सीखेच होणार आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, शिवसेना, श्रमजिवी संघटना विकास पॅनल हे एकत्रित लढतात की, वेगवेगळे यांच्यावरच भाजपाचे गणित अवलंबुन आहे. सर्वच पक्षातील उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून उभे राहिले आहेत. सर्व पक्षातील नेत्यांमध्ये व प्रमुख कार्यकर्त्यांच्या गुप्त भेटीगाठी व फोडाफोडीचे राजकारण सुरू झालेले आहे. या निवडणुकीत बंडखोरीला ही उधाण येणार असल्याची चर्चा आहे. विक्रमगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर यशवंतनगर, टापलेपाडा, नवपाडा, वाकडूपाडा, संगमनगर अशा ५ ते ६ पाड्यांना नगर पंचायतीमधून वगळून स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी करण्यात आली होती. हाच मुद्दा धरत या पाड्यातील ग्रामस्थांनी आंदोलनेही केली पंरतु ही गावे नगरपंचायतीतून वगळली नसल्याने त्याचाही फटका या निवडणूकीला बसतोे की काय अशी ही शक्यता आहे.