मुंबई : मनसेचे आमदार राम कदम यांनी भाजपाप्रवेश करून उमेदवारी मिळविल्याने या मतदारसंघातली लढत लक्षवेधी ठरली आहे. इथली मुख्य लढत भाजपा, शिवसेना आणि मनसेत होईल. मात्र सेना आणि मनसे भाजपाविरोधात लढत नसून कदम यांच्याविरोधात लढत आहेत, असे चित्र येथील प्रचारातून दिसून येते. मुळात शिवसेनेची पकड असलेला हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत भाजपाच्या पारड्यात पडल्याने याचा काही अंशी फायदा मनसेच्या कदम यांना झाला आणि ते निवडून आले. मात्र मनसेत असताना त्यांच्या ‘हम करे सो..’ कारभारामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये फूट पडली. मधल्या काळात त्यांनी पक्षाला बाजूला सारून स्वत:चा ब्राण्ड तयार करण्याचा प्रयत्न केला. कथितरीत्या ५० हजार भाविकांना देवदर्शन, हजारो महिलांकडून रक्षाबंधन अशा कार्यक्रमांमधून कदम यांनी प्रसिद्धी मिळवली. मात्र आमदार म्हणून विकासकामांकडे त्यांनी दुर्लक्ष केले, अशी बोंब मतदारसंघात सर्वत्र आहे. कदम भाजपामध्ये गेल्याने मनसेने नगरसेवक दिलीप लांडे यांनाच त्यांच्याविरोधात उभे केले. दुसरीकडे शिवसेनेने विभागप्रमुख सुधीर मोरे यांच्यावर लढतीची जबाबदारी सोपविली आहे. मनसे आणि शिवसेनेने या मतदारसंघात प्रचाराचा झंझावात निर्माण केलेला असतानाच भाजपा थंड पडल्याचे चित्र आहे. कदम यांच्याकडे प्रचाराला कार्यकर्ते नाहीत, अशी अवस्था आहे.
बिगफाईट - घाटकोपर पश्चिम राम कदमांविरोधात शिवसेना, मनसे
By admin | Updated: October 10, 2014 05:38 IST