MLC Election: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या ५ जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाल्याने प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चितीच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीत भाजपकडून पाचपैकी तीन जागांवर उमेदवार देण्यात येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी एक उमेदवार दिला जाणार असल्याचे समजते. भाजपकडून या निवडणुकीत उमेदवारांबाबत धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांच्यासह दादाराव केचे आणि अमरनाथ राजूरकर यांची नावे प्रदेश पातळीवरून केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. या माध्यमातून ज्येष्ठ नेत्यांना न्याय देण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाणार आहे. माधव भांडारी यांचे नाव यापूर्वीही अनेकदा विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले होते. मात्र वारंवार चर्चा होऊनही अद्याप त्यांना विधिमंडळात संधी मिळालेली नाही. त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी त्यांच्या सुपुत्रांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत जाहीरपणे खंत व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा भांडारी यांचे नाव चर्चेत आल्याने त्यांच्या निष्ठेला पक्षाकडून न्याय दिला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, भाजपकडून उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या दादाराव केचे यांनी यापूर्वी आर्वी मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. तर माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी अशोक चव्हाण यांची साथ देत मागील वर्षी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
कोणत्या नेत्यांमुळे रिक्त झाल्या विधानपरिषदेच्या जागा?
आमदार आमश्या फुलाजी पाडवी यांचा विधानपरिषद सदस्य म्हणून ७ जुलै २०२८ पर्यंत कालावधी, प्रविण प्रभाकरराव दटके (१३ मे २०२६), राजेश उत्तमराव विटेकर – (२७ जुलै २०३०), रमेश काशिराम कराड – (१३ मे २०२६) आणि गोपीचंद कुंडलिक पडळकर यांचा कार्यकाळ समाप्ती १३ मे २०२६ असा आहे. मात्र, या सदस्यांची २३ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून निवड झाल्याने भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेकरिता काही दिवसांपूर्वी द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला.
कसा आहे निवडणूक कार्यक्रम?
विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवार, १० मार्च २०२५ रोजी अधिसूचना जारी केली गेली असून सोमवार, १७ मार्च, २०२५ पर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जांची छाननी मंगळवार, १८ मार्च, २०२५ रोजी केली जाईल, तर नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत गुरूवार, २० मार्च, २०२५ अशी आहे. गुरूवार, २७ मार्च, २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर त्याच दिवशी ५ वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक २९ मार्च, २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.