ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - सरकार ' सबका साथ सबका विकास' असा नारा देत असतानाच मुंबईतील एका तरूणाला तो मुस्लिम असल्याने नोकरी नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झिशान अली असे त्या तरूणाचे नाव असून त्याने एमबीएचे शिक्षण घेतले आहे. झिशानने आपल्या दोन मित्रांसह 'हरे कृष्णा एक्स्पोर्ट्स' या हि-यांची निर्यात करणा-या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र 'आम्ही फक्त बिगर-मुस्लिम उमेदवारांनाच नोकरी देतो' असा मेल पाठवत या कंपनीने त्याला नोकरी देण्यास नकार दिला. कंपनीच्या या धार्मिक भेदभावामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे धक्का बसलेल्या झिशानने या अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला आणि सोशल नेटवर्किंग साईट्वर कंपनीचा रिप्लाय पोस्ट केला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसमावेशक विकासाची भाषा करत असतानाच नोकरी देणा-या कंपन्या असे भेदभाव करणारे वर्तन करतात. माझ्याकडे पुरेसे शिक्षण नव्हते तर कंपनीने मला तसे सांगायला हवे होते, पण नोकरी ने देण्यासाठी त्यांनी दिलेले ( धर्माचे) कारण अतिशय चीड आणणारे आहे ' अशी उद्वीग्न प्रतिक्रिया झिशानने दिली आहे.
मात्र 'झिशानला पाठवण्यात आलेला ई-मेल चुकीने पाठवण्यात आल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले. ज्या कर्मचा-याने झिशानला मेल पाठवला, तो कर्मचारी अद्याप प्रशिक्षण घेत आहे. नोकरी देताना आपण कोणताही धार्मिक भेदभाव करत नाही,' असा दावाही कंपनीने केला आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपासासाठी पोलिस त्या कंपनीत दाखल झाले आहेत.