शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

या अग्निपरीक्षेतूनही पावन होऊ! - उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 07:27 IST

शिवसेनेसाठीही ही लढाई मानाची आणि प्रतिष्ठेची बनली असून याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी 'आपण अग्निपरीक्षेतूनही पावन होऊ' असा विश्वास व्यक्त केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २१ - मुंबई, ठाण्यासह  १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी थोड्याच वेळात मतदान होणार असून प्रतिष्ठेच्या या लढाईत कोण बाजी मारतंय याकड सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिवसेनेसाठीही ही लढाई मानाची आणि प्रतिष्ठेची बनली असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'आपण अग्निपरीक्षेतूनही पावन होऊ' असा विश्वास व्यक्त केला आहे. 'शिवसेनेने लोकांना विश्वास दिला म्हणून बदल्यात विश्वास मिळवला. मुंबईकर जनतेला इतक्या वर्षांनंतरही ‘मुख्यमंत्री व त्यांच्या टोळक्यांपेक्षा शिवसेनेचाच आधार वाटतो. शिवसेना हाच अखंड महाराष्ट्राचा ‘राजदंड’ आहे. तो कुणालाच दूर करता येणार नाही' असेही त्यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
उद्धव यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडत 'कृतघ्नता  हे भारतीय जनता पक्षाचे दुसरे नाव आहे' असेही म्हटले आहे. 'सत्तेवर येण्याआधी पाकिस्तानच्या विरोधात 56 इंचांची छाती दाखवून सत्ता येताच पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचे ‘चायपाणी’ स्वीकारण्याचे ढोंग आणि विश्वासघात शिवसेनेने केला नाही' असे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या '५६ इंच ' छातीच्या वक्तव्यावरही हल्ला चढवला. या लढाईत शिवसेनेचाच विजय होईल, असा विश्वास उद्धव यांनी अखेर व्यक्त केला आहे. 
 
अग्रलेखातील महत्वपूर्ण मुद्दे : 
- मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वणवा पेटला आहे. हा वणवा म्हणजे फक्त राजकीय शेकोटी नसून विचारांचा आणि स्वाभिमानाचा अग्नी आहे. या अग्निपरीक्षेत शिवसेना नक्कीच पावन होईल. मुंबईतील प्रत्येक स्वाभिमान्याचे मत शिवसेनेला मिळेल. महाराष्ट्रात जेथे जेथे मतदान आहे तेथे तेथे महाराष्ट्रद्वेष्टय़ांना आडवे करण्यासाठीच मतपेटीतून ठिणग्या उडतील. आजचा दिवस शुभ आहे, मंगलमय आणि क्रांतीचा आहे. इतर टिनपाट पक्षांचे सोडून द्या. ते तर आमच्या खिजगणतीतही नाहीत. पण भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या विरोधात जी आदळआपट आणि गोंगाट चालवला आहे तो कृतघ्नपणाचा अध्याय आहे. महाराष्ट्रासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी रक्त सांडणारी शिवसेना भारतीय जनता पक्षाला अचानक ‘स्वार्थी सेना’ वाटू लागली हा विनोदच म्हणावा लागेल. याच ‘स्वार्थी सेने’च्या खांद्यावर बसून तुम्ही महाराष्ट्रात वाढलात हे इतक्या लवकर विसरलात? पण कृतघ्नता हे भारतीय जनता पक्षाचे दुसरे नाव आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आचारात आणि विचारात असा कोणता स्वार्थ पाहिला? 
 
- शिवसेनेचा स्वार्थ असलाच तर तो हाच की, शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाचे पालन करून आम्ही वेळोवेळी राजकारण खुंटीला टांगून ठेवून सामान्यजनांच्या सेवेचा वसा घेतला. मुंबई-ठाण्यासारख्या शहरात भगवा झेंडा लावलेल्या शेकडो रुग्णवाहिका चालवून गोरगरीबांच्या सेवेला वाहून घेतले. आमचा स्वार्थ इतकाच की, तुमच्याप्रमाणे फक्त पोकळ आश्वासनांची थुंकी न उडवता जनतेच्या सुखदुःखात मदत करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. मुंबईत धर्मांधांनी घडवलेले बॉम्बस्फोट, दंगली असोत, घातपात असोत, इमारत दुर्घटना असोत, आमच्या शिवसैनिकांनी जीवाची बाजी लावून, स्वतः रक्तबंबाळ होऊन मृतदेह आणि जखमींना स्वतःच्या खांद्यावर उचलून इस्पितळात नेण्याचा स्वार्थ जपलाच आहे. दुष्काळी भागात फिरून शेतकऱयांना आधार दिला आहे. भारतीय जनता पक्षाने मात्र स्वतःच्या डोळय़ांवर स्वार्थाची झापडं बांधून कानात मतलबाचे बोळे कोंबले आहेत. त्यामुळे त्यांना सत्य दिसत नाही व शिवसेनेचा जयजयकार ऐकू येत नाही. बाबरी कोसळत असताना, तेथे जमलेले ‘रामसेवक’ पोलिसी गोळय़ांना बळी पडत असताना स्वतःची सुटलेली धोतरे सांभाळून रणातून पळ काढणारी अवलाद शिवसेनेची नाही; तर ‘‘होय, बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर हिंदू म्हणून मला त्यांचा अभिमान आहे’’ अशी गर्जना करीत हिंदुत्वाला तेज आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा ‘स्वार्थ’ शिवसेनेने जपला आहे. होय, प्रखर महाराष्ट्र अभिमान, धर्माभिमान, राष्ट्राभिमान याबाबतीत तडजोड न करण्याचा स्वार्थ आम्ही जपलाच आहे. 
 
- शिवसेनेने कधी ढोंग केले नाही. दुतोंडय़ा सापाच्या भूमिका वठवल्या नाहीत. ‘पोटात एक, ओठावर दुसरे’ हे असले मतलबी प्रकार केले नाहीत. सत्तेवर येण्याआधी पाकिस्तानच्या विरोधात 56 इंचांची छाती दाखवून सत्ता येताच पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचे ‘चायपाणी’ स्वीकारण्याचे ढोंग आणि विश्वासघात शिवसेनेने केला नाही. जे बोललो ते करून दाखवण्याची हिंमत आमच्या मनगटात आहे आणि राहणारच. आज महाराष्ट्रात तुमची सत्ता आहे, पण न्यायासाठी तडफडणाऱ्यांच्या किंकाळय़ा तुम्हाला ऐकू येत नाहीत. महागाई व गरिबीच्या वणव्यात जळणाऱया समाजाची तडफड तुम्हाला दिसत नाही. ‘नोटाबंदी’नंतर शेतकऱयांची झालेली दीन अवस्था तुमच्या डोळय़ांच्या कडा ओल्या करीत नाही. फक्त शिवसेनेवर टीका करून व आमच्या  विरोधाचे ढोल बडवून महाराष्ट्राच्या जनतेचा आक्रोश तुम्ही कसा थांबवणार? आम्हाला तुमची कीव येत आहे. हे क्रौर्य आहे, स्वार्थ आहे. 
 
- नवऱ्याबरोबर सती म्हणून त्याच्या विधवेला चितेत ढकलण्याचे क्रौर्य करणाऱ्या नराधमांना तिच्या आर्त किंकाळय़ा ऐकू येऊ नयेत यासाठी नगारे बडविणारे एकसारखे नगारे पिटत आकाशपाताळ एक करीत. त्याच पद्धतीने तुमचे शिवसेनेच्या विरोधात नगारे बडविण्याचे प्रकार चालले आहेत. पण शिवसेनेच्या विरोधात कितीही नगारे बडवलेत तरी तुमची पापे लपणार नाहीत व जनतेचा तुमच्या विरोधातील आक्रोश थंडावणार नाही. ही अशी बोंबाबोंब करण्याइतपत कोणता गुन्हा शिवसेनेने केला? ‘मुंबई’ ही मराठी माणसाची आणि महाराष्ट्राचीच राहणार! भाजपवाले सांगतात त्याप्रमाणे महाराष्ट्राचे चार-पाच तुकडे पाडू देणार नाही व तसे करण्याचा प्रयत्न करणाऱयांचे तुकडे करू, असा संताप व्यक्त करणे हा आमचा गुन्हा असेल तर होय, आम्ही गुन्हेगार आहोत व श्वासाच्या अंतापर्यंत आम्ही हा गुन्हा करीत राहणार. याच संतापाच्या उद्रेकातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला व त्याच उद्रेकाचा लाव्हा म्हणजे शिवसेना आहे. शिवसेनेमुळे मुंबई निर्भय आणि सुरक्षित आहे. शिवसेनेने कधीच कुणाचा द्वेष आणि तिरस्कार केला नाही. येथे गुजराती आले, मारवाडी आले, बंगाली-पंजाबी-दाक्षिणात्य आले. ज्यांनी महाराष्ट्राला आपले मानले ते आपले झाले. महाराष्ट्राचे हित जपा. मुंबईच्या विकासाला हातभार लावा हेच आमचे सांगणे राहिले आहे. 
 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे ऐतिहासिक सत्य एका जाहीर सभेत मांडले तेच खरे आहे, ‘‘मराठी माणूस गरीब असला तरी तो कधीच कुणाचा द्वेष करीत नाही की लांडय़ालबाडय़ा करून श्रीमंत होण्यासाठी धडपडत नाही याचा मला अभिमान वाटतो.’’ जे मुख्यमंत्री शिवसेनेवर आरोप करीत आहेत ते एकप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करीत आहेत. शिवसेना म्हणजे मऱहाटी माणसाच्या न्याय्य आशाआकांक्षांचा आवाज आहे. राष्ट्रीय धर्म सांभाळत हा आवाज जपणे हेच हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व आहे. नेपोलियनच्या सैन्याप्रमाणे पोटावर चालणारी ही सेना नव्हे. छत्रपती शिवरायांच्या ‘हिंदवी स्वराज्या’च्या भावनोद्रेकाने पेटलेल्या मनोवृत्तीचे हे सैन्य आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पराभवासाठी पिचकी मनगटे आपटणाऱयांनी व तोंडातील कवळय़ा दाबून आव्हान देणाऱयांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात व महाराष्ट्राच्या लढय़ात तुमचे नाव नाही. 
 
- हिंदुत्वाच्या लढय़ात तुम्ही पाठ दाखवून पळून गेलात, लढली ती फक्त शिवसेना! शिवसेनेला आडवे जाऊ नका. मुंबईसह महाराष्ट्राची जनता शिवसेनेच्या विजयासाठी मैदानात उतरली आहे. लोकांचे प्रेम मिळविण्यासाठी भाग्य लागते व भाग्यासाठी लोकांवर श्रद्धा लागते. शिवसेनेने लोकांना विश्वास दिला म्हणून बदल्यात विश्वास मिळवला. मुंबईकर जनतेला इतक्या वर्षांनंतरही ‘मुख्यमंत्री व त्यांच्या टोळक्यांपेक्षा शिवसेनेचाच आधार वाटतो. कारण शिवसेना हाच ‘महाराष्ट्रा’चा खरा आधार. शिवसेना हाच अखंड महाराष्ट्राचा ‘राजदंड’ आहे. तो कुणालाच दूर करता येणार नाही. आम्ही मुंबईसह महाराष्ट्राच्या कोटय़वधी जनतेचे ऋणी आहोत. तिने शिवसेनेवर उदंड प्रेम केले. आम्ही माय-बाप जनतेपुढे नतमस्तक आहोत. मुंबई-महाराष्ट्रातील जनतेला आम्ही प्रेमाचा साष्टांग दंडवत घालीत आहोत.