मुंबई : आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्टने भाडेवाढीचा पर्याय निवडला़ त्यानुसार १ एप्रिलपासून या वर्षातील दुसरी भाडेवाढ लागू होत आहे़ परंतु १ फेब्रुवारीपासून झालेल्या भाडेवाढीमुळे उत्पन्न वाढले तरी दररोजची प्रवासीसंख्या मात्र दोन लाख १५ हजारांनी घटल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ २००१ पासून १० वर्षांमध्ये भाडेवाढ झाली नाही, या सबबीखाली बेस्ट उपक्रमाने या वर्षी दोन भाडेवाढींचा प्रस्ताव आणला़ यास पालिका महासभेनेही हिरवा कंदील दाखविला़ त्यानुसार १ फेब्रुवारीपासून किमान भाडे सात रुपये झाले़ या भाडेवाढीमुळे ३७ लाख ९५ हजारांनी उत्पन्न वाढले खरे़ मात्र जानेवारी महिन्याच्या तुलनेत भाडेवाढ झाल्यानंतर प्रवासी संख्या झपाट्याने घटल्याची कबुली प्रशासनानेच दिली आहे़काही वर्षांपूर्वी बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज सरासरी ४२ लाख प्रवाशी प्रवास करीत होते़ मात्र रस्त्यावर बंद पडणाऱ्या बसगाड्या, बस स्टॉपवर तासन्तास करावी लागणारी प्रतीक्षा या कारणांमुळे अनेक प्रवाशांनी शेअर रिक्षाचा पर्याय निवडला़ या प्रवाशांना पुन्हा बसगाड्यांकडे वळविण्याचे बेस्टचे प्रयत्न फेल गेले, तेव्हापासून प्रवासी संख्येत लक्षणीय घट होऊ लागली आहे़ (प्रतिनिधी)
भाडेवाढीमुळे बेस्टचे प्रवासी घटले
By admin | Updated: April 1, 2015 03:11 IST