लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभेत गुरुवारी शिंदेसेनेचे मंत्री आणि उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक झाली. यावेळी आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी सभागृहात केलेले हातवारे आणि वापरलेली भाषा, याबाबत विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.
पूर्वी नियमबाह्य कामकाज झाले असेल तर ते पुन्हा झाले पाहिजे, अशी आपली अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. मी भास्कर जाधवांना स्पष्ट शब्दांत सांगितले ‘राइट टू रिप्लाय’चा अधिकार चर्चा सुरुवात करणाऱ्या सदस्याला असतो. तुम्ही माझ्यावर कितीही आरोप करा, या सभागृहात मी नियमबाह्य काम होऊ देणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
विरोधकांच्या २९३च्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिल्यानंतर विरोधकांकडून उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा काही प्रश्न विचारण्याची (राइट टू रिप्लाय) परवानगी अध्यक्षांकडे मागितली.
मात्र, चर्चेची सुरुवात ठाकरे यांनी केली होती, आता ते सभागृहात नाहीत, त्यामुळे इतर कोणालाही मी ही संधी देणार नाही, असे सांगत अध्यक्षांनी परवानगी नाकारली.
मंत्री अन् आमदार उतरले वेलमध्ये, कामकाज तहकूबपरवानगी नाकारल्यानंतर आक्रमक होत जाधव अध्यक्षांकडे हातवारे करत जोरदार बोलत होते. जाधव यांच्या या कृतीने शिंदेसेनेचे मंत्री आणि आमदार वेलमध्ये उतरले. हा सगळा गोंधळ सुरू असताना ठाकरे हे शिंदेसेनेच्या मंत्र्यांकडे हातवारे करत सभागृहात आले.त्यांच्या या कृतीमुळे गोंधळ वाढला. शिंदेसेनेचे मंत्री ठाकरे यांच्याकडे बघून हातवारे करत बोलत होते, तर उद्धवसेनेचे आमदारही आक्रमक झाले. या गोंधळात विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली. तुम्ही रेटून कामकाज नेऊ शकणार नाही, मनमानी करू शकणार नाही, अशी जाधव यांनी अध्यक्षांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्ये केली.उद्धवसेनेचे दुसरे सदस्य आदित्य ठाकरे सभागृहात हातवारे करत आले. त्यांचेही सीसीटीव्ही फुटेज तपासा. विधानसभेत हे योग्य नाही, असे देसाई म्हणाले.
सभागृहाची गरिमा प्रत्येकाने पाळावी भास्कर जाधव हातवारे करत होते, बोलत होते ते योग्य आहे का? असा सवाल करत सभागृहाची गरिमा सर्वांनीच पाळली पाहिजे, असे या विषयाचा शेवट करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.