बारामती : बायोडिझेलच्या नावाखाली निकृष्ट दर्जाच्या डिझेलचा पुरवठा करून बारामती येथील उद्योजकाची १ कोटी ४१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई येथील आरोपी उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या उद्योजकाचा अपर जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी (दि. १) अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती येथील इंडियन बायोडिझेल कॉर्पोरेशनचे प्रमुख नीलेश बोबडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बोबडे यांनी माटुंगा मुंबई येथील रॉयल एनर्जी लिमिटेड यांच्याकडून १ लाख लिटर बायोडिझेल खरेदी केले. मात्र, प्रत्यक्षात बायोडिझेलच्या नावाखाली रसायनयुक्त डिझेलचा पुरवठा करण्यात आला. २००७ पासून हा प्रकल्प सुरू होता. त्यानुसार तालुक्यातील ४८ गावांमध्ये तेलबियांच्या वृक्षांची लागवड करण्याचे काम सुरू होते. या गावांमध्ये छोटी आॅईल मिल सुरू करून त्यातून तयार झालेले तेल काढून ते इतर तेल कंपन्यांना पुरविण्याचे नियोजन होते. त्या वृक्ष लागवडीसाठी ट्रॅक्टरने नांगरट करणे, रोपांची ने-आण करणे यासाठी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा वापर होत होता. या ट्रॅक्टरसाठी आवश्यक इंडियन बायोडिझेलच्या वतीने बायोडिझेलचा पुरवठा सुरू होता. या निकृष्ट दर्जाच्या डिझेलमुळे बारामती परिसरातील शेतकऱ्यांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच, हा प्रकल्प ठप्प झाला आहे, अशी तक्रार बोबडे यांनी दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी आरोपी विशेष राजेंद्र अग्रवाल यांच्यावर आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला. त्यामुळे बारामती पोलीस लवकरच आरोपीला अटक करण्याची शक्यता आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ए. आर. यादव, पोलीस कॉन्स्टेबल तात्यासाहेब खाडे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
बारामतीच्या उद्योजकाची १ कोटी ४१ लाखांची फसवणूक
By admin | Updated: August 2, 2016 01:33 IST