Balasaheb Thackeray Birth Anniversary : मुंबई : शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) जयंती असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून आदरांजली अर्पण केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण केले आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की, "बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली वाहतो. समाज कल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासाप्रती असलेल्या बाळासाहेबांच्या वचनबद्धतेबद्दल त्यांचा सर्वत्र आदर केला जातो आणि त्यांचे स्मरण केले जाते."
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, "बाळासाहेबांनी आपल्या मूळ विचारांबद्दल कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे." दरम्यान, मुंबईसह राज्यभरात आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरातील शिवसैनिक, राजकीय नेते बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत आहेत.
याचबरोबर, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत दोन शिवसेनेचे मेळावे होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा अंधेरी येथील शहाजे राजे क्रिडा संकुलात होणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाने मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात मेळावा आयोजित केला आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शरद पवारांचे ट्विट!बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शरद पवार यांनीही ट्विट केले आहे. "प्रभावी व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध व्यंगचित्रांच्या माध्यमातून 'मार्मिक' भाष्य केले. कुशल संघटक व मुत्सद्दी राजकारणी असलेल्या बाळासाहेबांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा दिला. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसांच्या स्वाभिमान जागृतीसाठी कायम प्रयत्नशील राहिलेले शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन", अशी पोस्ट शरद पवारांनी केली आहे.