नागपूर : मध्य प्रदेशातील पत्रकाराचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला़ संदीप कोठारी (२८) असे मृत पत्रकाराचे नाव आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह वर्धा जिल्ह्यात नेऊन जाळला. या प्रकरणी बालाघाट पोलिसांनी नागपुरातून दोघांना ताब्यात घेतले़ तिसरा आरोपी फरार असून, हे हत्याकांड सुपारी किलिंगचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे. बालाघाट जिल्ह्यातील कटंगी येथील संदीप तीन वर्षांपासून मुक्त पत्रकार म्हणून काम करीत होता. वाळू आणि कोळसा माफियांविरोधात तसेच अवैध धंद्यांविरुद्ध त्याने आघाडी उघडली होती. शुक्रवारी रात्री हल्लेखोरांनी संदीपचे अपहरण केले. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून नागपुरातील कुख्यात गुन्हेगार ब्रजेश डहरवाल आणि संदीप तांडीला अटक केली. संदीपचा मृतदेह नागपूरच्या एका गावाजवळ फेकल्याचे आरोपींनी सांगितले. फॉरेन्सिक प्रक्रियेनंतर त्याचा मृतदेह बालाघाट पोलिसांच्या ताब्यात दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)
बालाघाटमधील पत्रकाराची हत्या
By admin | Updated: June 23, 2015 02:21 IST