ऑनलाइन लोकमत
बदलापूर, दि. ४ - पालिका निवडणूक तोंडावर आलेली असतानाच बदलापूर आज एका शिवसैनिकाच्या हत्येने हादरले. शिवसेनेचे उपशाखाप्रमुख केशव मोहिते यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली. आज सकाळी सातच्या सुमारास एमआयडीसी परिसरात ही घटना घडली असून शहरात तणावाचे वातावरण आहे..
रिक्षाचालक असलेले मोहिते यांच्या रिक्षात तीन अनोळखी प्रवासी बसले होते. चालत्या रिक्षातच त्यांनी मोहिते यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहिते यांना डोंबिवलीमधील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. मोहिते यांच्या हत्येच्या निषेधार्थ शहरातील रिक्षा बंद ठेवण्यात आल्या.