Aurangzeb Tomb Row: छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) जवळील खुलताबाद येथे मुघल सम्राट औरंगजेबाची कबर आहे. गेल्या काही दिवसांपासून ही कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेसह राज्यातील काही नेत्यांनी ही कबर हटवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली असून, या मागणीला काही अर्थ असल्याचे म्हटले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एबीपी न्यूजशी बोलताना म्हटले की, 'औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी योग्य आहे कारण त्याने अनेक अत्याचार केले आहेत. औरंगजेब अतिशय क्रूर होता, त्याने छत्रपती संभाजी महाराजांची क्रुरतेने हत्या केली, परंतु तो मराठा साम्राज्य जिंकण्यात अपयशी ठरला आणि शेवटी महाराष्ट्रातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे राजकारण कोणी करू नये. राज्य सरकारने दोन्ही पक्षांशी चर्चा करावी, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली.
काय आहे औरंगजेबाच्या कबरीचा वाद?महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती, मात्र अलीकडे या मागणीने जोर धरला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी म्हणाले होते की, औरंगजेब हा महान शासक होता आणि त्याने अनेक मंदिरे बांधली. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि हिंदू संघटनांनी निषेध केला आणि कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तर बुलडोझरने कबर हटवण्याची मागणी केली. खासदार नवनीत राणा यांनीही कबर हटवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला.
सरकारचा प्रतिसादमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणावर म्हटले की, औरंगजेबाची कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) च्या संरक्षणाखाली आहे आणि ती काढण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. कबर हटवायची की नाही, हा केवळ आपल्या सरकारचा नसून संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे. ती हटवण्याचा घाईघाईने निर्णय घेता येणार नाही. पण, या कबरीचे कोणी उदात्तिकरण करत असेल, तर त्याला सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.