पारनेर (अहमदनगर) : घरासमोरील अंगणात खेळणारी सात वर्षीय मुलगी व तिच्या बहिणीला चॉकलेटचे आमिष दाखवून शेतात नेऊन लैगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पळशी (ता. पारनेर) येथे झाला. पोलिसांनी पोपट शंकर साळवे (५०) यास अटक केली आहे. पळशीसह तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे़ तसेच सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे़पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पळशी गावात राहणाऱ्या कुटुंबातील सात वर्षीय मुलगी व तिची लहान बहीण घरासमोर खेळत असताना त्यांच्याच ओळखीचा पोपट साळवे त्यांच्याकडे गेला. घरी कोणी नाही, हे पाहून त्यांना चॉकलेटचे आमिष दाखवून त्या दोघींना शेजारील मक्याच्या शेतात घेऊन गेला़ त्यातील सात वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न साळवे याने केला. त्याचवेळी मुलींचे काका आल्याचे समजताच त्याने पळ काढला. त्यानंतर पीडित मुलगी व तिच्या बहिणीने आई, वडील व काकांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. संतापजनक प्रकारानंतर मुलीचे आई, वडील यांच्यासह सुमारे दोनशे ग्रामस्थांनी पारनेर पोलीस ठाणे गाठले. (प्रतिनिधी)पळशी गावात बंद : रविवारी पळशी गावात घटनेचा निषेध करून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. टाकळी ढोकेश्वर येथे ‘रास्ता रोको’ करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दोनशे जणांचा ठिय्या : पारनेर पोलिसांनी रात्री उशिरा पोपट साळवे याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. घटना कळताच पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी घटनेची माहिती घेतली. शनिवारी रात्री तीन वाजेपर्यंत सुमारे दोनशे जणांचा जमाव पारनेर पोलीस ठाण्यासमोर बसून होता. फिर्याद दिल्यानंतरच पळशीचे ग्रामस्थ गावाकडे परतले.
नगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
By admin | Updated: October 10, 2016 05:15 IST