पालिका सभागृहातील गैरवर्तणुकीला बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2016 09:28 PM2016-07-28T21:28:48+5:302016-07-28T21:28:48+5:30

नागरी समस्यांवर आवाज उठविण्यासाठी आपल्या वक्तृत्वापेक्षा ताकदीचा वापर नगरसेवक करु लागले आहेत़

The arsenal of municipal council will take place | पालिका सभागृहातील गैरवर्तणुकीला बसणार चाप

पालिका सभागृहातील गैरवर्तणुकीला बसणार चाप

Next

 शेफाली परब/ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 28 - नागरी समस्यांवर आवाज उठविण्यासाठी आपल्या वक्तृत्वापेक्षा ताकदीचा वापर नगरसेवक करु लागले आहेत़ त्यामुळे शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर आता हाणामारीच्या प्रसंगामध्ये होऊ लागले आहे. याची गंभीर दखल घेत या ऐतिहासिक सभागृहाचा मान राखण्यासाठी नगरसेवकांना आचारसंहिता लागू करण्याचा प्रस्ताव खुद्द आयुक्त अजोय मेहता यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांपुढे ठेवला आहे. त्यानुसार बेशिस्त नगरसेवकाला सभागृहाबाहेर काढणे तर वेळ पडल्यास त्यांचे पद रद्द करण्याची शिफारसच त्यांनी केली आहे.
जनतेचा आवाज पालिका प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदार नगरसेवकाची असते़ पालिका महासभेच्या माध्यमातून नगरसेवकांना नागरी समस्यांवर प्रशासनाला जाब विचारता येत असतो़ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पालिका महासभेतील चर्चेचा स्तर खालावला आहे़ नगरसेवकांमध्ये हाणामारीचे प्रसंग वारंवार घडू लागले आहेत़ देवनार कचरा समस्येवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी व्यासपीठावर महापौर व आयुक्तांच्या दिशेने कचरा भिरकवला़ हा प्रसंग सभागृहात बसलेल्या अन्य सदस्यांसाठी नित्यनेहमाचा असेल़ मात्र आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्धार केला आहे. बेशिस्त व गैरवर्तणूक करणाऱ्या सदस्याला सभागृहाबाहेर काढण्याचे अधिकार महापौरांना असतात़ मात्र नगरसेवक या कारवाईला जुमानत नसल्याने महापौरांचा अवमान होत आहे. त्यामुळे पालिका सभागृहातही शिस्तीचे पालन होण्यासाठी आचारसंहितेचा मसुदाही आयुक्तांनी तयार केला आहे.

अशी असेल आचारसंहिता 
निलंबित केल्यानंतरही सदस्य सभागृहाच्या बाहेर जात नसल्यास पीठासीन अधिकारी मार्शल्सची मदत घेऊन नगरसेवकाला बाहेर काढू शकतात. बेशिस्त ठरलेल्या नगरसेवकाला इतर समित्यांच्या कामकाजातही भाग घेण्यास प्रतिबंध करण्यात यावा. प्रतिस्पर्धी बाकावरील नगरसेवकांना बोलण्याची संधी मिळू नये यासाठी बऱ्याचवेळा नगरसेवक सभागृहात शिटी आणून वाजवितात़ तर काहीवेळा कचरा आणणे, दूषित पाण्याची बाटली आणणे असे प्रकार घडतात़ सभागृहात अशा कोणत्याही वस्तू आणण्यास बंदी घालण्यात यावी़ तसेच नगरसेवकांच्या तपासणीची प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाला परवानगी द्यावी़. सभागृहात खणखणणारे मोबाईलचे आवाज बंद करण्यासाठी जॅमर बसविण्यात यावे़ तसेच अशोभनिय वर्तणुकीबद्दल संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करण्याचा ठराव पालिका महासभेत मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा. सभागृहाची गरिमा राखणे व पीठासीन अधिकाऱ्याचा आदर करणार असे शपथपत्रच नगरसेवकांकडून घेणे, हा मसुदा सर्वपक्षीय गटनेत्यांच्या येत्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. यास मंजुरी मिळाल्यानंतर हा मसुदा राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.

Web Title: The arsenal of municipal council will take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.