मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष NIA कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने या खटल्यातील सर्व ७ आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. त्याशिवाय माजी एटीएस अधिकाऱ्याने केलेला दावा फेटाळला आहे. या गुन्ह्यात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश दिले होते असा दावा माजी अधिकारी मेहबूब मुजावर यांनी केला होता. मात्र हा आदेश मानण्यास मी नकार दिल्याचे मुजावर यांनी सांगितले होते. हा दावा निराधार असल्याचे कोर्टाने म्हटलं आहे.
विशेष एनआयए कोर्टाचे न्या. लाहोटी यांनी १ हजाराहून अधिक पानांच्या या निर्णयात स्पष्ट केलंय की, या दाव्यात कुठलाही ठोस आधार नाही. हा युक्तिवाद आरोपी सुधाकर द्विवेदी यांच्या वकिलांनी कोर्टात ठेवला होता. त्यात मेहबूब मुजावर यांच्या जुन्या विधानांचा हवाला देण्यात आला होता. राजकीय दबावापोटी भगवा दहशतवाद नॅरेटिव्ह चालवण्यासाठी भागवत यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला होता. एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी हे केले गेले होते. मात्र हा आदेश मानण्यास मी नकार दिला होता. कारण तपासात भागवत यांच्याबाबत कुठलेही पुरावे नव्हते असं मुजावर यांनी म्हटलं होते.
कोर्टाकडून ही विधाने निरर्थक ठरवण्यात आली. आदेशात न्या. लाहोटी यांनी बचाव पक्षाकडून करण्यात आलेला तो युक्तिवाद फेटाळला, जो तत्कालीन तपास अधिकारी मोहन कुलकर्णी यांच्या विधानावर आधारित होता. मुजावर यांना आरएसएसच्या कुठल्याही सदस्याच्या अटकेचे आदेश दिले नव्हते. त्यांना केवळ फरार आरोपी रामजी कलसांगरा आणि संदीप डांगे यांचा शोध घेण्यास सांगितले होते असं कुलकर्णींनी म्हटलं होते. कोर्टाचा हा निर्णय केवळ या खटल्याची कायदेशीर दिशा ठरवणार नाही तर दीर्घ काळापासून सुरू असलेला वादही संपवणार आहे. ज्यात मालेगाव स्फोटाप्रकरणी आरएसएस प्रमुखाचे नाव जोडले होते.
मुजावर यांनी काय केला होता दावा?
मालेगाव स्फोट प्रकरणी मोहन भागवत यांना पकडा, असे मला आदेश मिळाले होते. हिंदू दहशतवाद ही थेअरी खोटी होती. मला मोहन भागवत यांना अडकवण्याच्या सूचना होत्या. मोहन भागवत यांना पकडून हा स्फोट हिंदू दहशतवाद होता हे सिद्ध करायचे होते. हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठीच माझा या प्रकरणाच्या तपासात सहभाग करण्यात आला होता. मला थेट मोहन भागवतांना अडकवण्याचे निर्देश होते. हे आदेश तत्कालीन मालेगाव स्फोट तपासाचे प्रमुख अधिकारी परमबीर सिंह आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला होता असा दावा मुजावर यांनी केला होता.