मुंबई : महावितरणच्या पायाभूत आराखड्यांतर्गत होणारी कामे गुणवत्तापूर्ण व गतीने व्हावीत यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिली. वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयात शुक्रवारी आयोजित संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कामांचा दर्जा चांगला राखण्याबाबतचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले. केंद्र सरकारच्या अर्थसाहाय्यातून राज्यात महावितरणच्या वतीने दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतील कामे केली जात आहेत. या कामांना गती देण्यासाठी तसेच कामांची गुणवत्ता कायम राखण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी परिमंडल स्तरावर बैठकीचे आयोजन करून वेळोवेळी कामाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा. कामाची गुणवत्ता कायम राखावी; यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचेही आयोजन करावे, असे निर्देश कुमार यांनी या वेळी दिले. (प्रतिनिधी)
गुणवत्तेसाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती
By admin | Updated: January 14, 2017 04:55 IST