ठाणे : आदिवासींच्या जमिनीसंदर्भातील वाद न्यायप्रविष्ट असतानाही त्याचे सील तोडण्याचा आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी कोकण विभागीय अपर आयुक्तांविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तेथील आदिवासींची मागणी आहे. त्यांनी तहसीलदारांना यासंदर्भात निवेदनाद्वारे इशाराही दिला आहे. कल्याण तालुक्यातील कांबा गावाच्या परिसरातील आदिवासींच्या जमिनी हडप करून त्यावर बेकायदा लघुउद्योग सुरू करण्यात आले होते. गोदामही बांधले होते. हे उद्योग आणि गोदाम सील करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार, ते सील करण्यात आले आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही कोकण विभागीय अपर आयुक्तांनी ते सील तोडण्याचे आदेश नुकतेच दिले. त्यामुळे त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न या आदिवासींकडून केला जात आहे. या मनमानी निर्णयासह अधिकारी, कर्मचारी सतत निरनिराळे डावपेच आखून बुधराणी कुटुंबाला पाठीशी घालत आहेत. त्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना मदत करीत असल्याचा आरोप करून अपर आयुक्तांचा आदेश चुकीचा असल्याची हरकत घेऊन त्याविरोधात आंदोलन करून अॅट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांसह आताच्या आदेशामुळे अपर आयुक्त, तहसीलदार अन्य संबंधित अधिकारी-कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
अपर आयुक्तांना ‘अॅट्रॉसिटी’ लावा
By admin | Updated: November 18, 2014 02:46 IST