वाढवण विरोधी आंदोलकांत फाटाफूट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2017 03:25 AM2017-03-06T03:25:14+5:302017-03-06T03:25:14+5:30

ओएनजीसीच्या सर्वेक्षणाला काही मच्छिमार छुप्या पद्धतीने सहकार्य करीत असल्याने ‘मच्छिमार एकजुटीला’ तडा जाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Anti-protesters protests? | वाढवण विरोधी आंदोलकांत फाटाफूट?

वाढवण विरोधी आंदोलकांत फाटाफूट?

Next

हितेन नाईक,
पालघर- मच्छिमारी व्यवसायाला उध्वस्त करायला निघालेल्या जिंदाल जेट्टी, वाढवणं बंदर, ओएनजीसीच्या सर्वेक्षणाला काही मच्छिमार छुप्या पद्धतीने सहकार्य करीत असल्याने ‘मच्छिमार एकजुटीला’ तडा जाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पैसे आणि आमिषे दाखवून मच्छीमारांच्या एकजुटीला पोखरले जात असल्याने संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी छुपे सहकार्य करणाऱ्या दांडेपाडा येथील एका मच्छीमारांच्या घराला गराडा घातला.
वाढवण बंदर १९९८ साली उभारण्याच्या घाट घालण्यात आल्या नंतर ह्या बंदरा विरोधात ग्रामस्थांचा मोठा जनक्षोभ उसळल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विरोध आणि पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या आदेशा नंतर हा प्रकल्प गुंडाळण्यात आला होता. मात्र भाजप-शिवसेनेची सत्ता आल्या नंतर पुन्हा हे बंदर उभारण्याची खुमखुमी अंगात शिरून कोणत्याही परिस्थितीत हे बंदर साकारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्या कडून केला जाऊ लागला. हे बंदर वाढवणं समोरील समुद्रात ४.५ नॉटिकल क्षेत्रात उभारले जाणार असून त्यासाठी लागणारा लोहमार्ग त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या चौपदीकरणाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यामुळे समुद्रातील प्रदूषणासह मानवी वस्तीला मोठी हानी पोहोचणार आहे. त्यामुळे सागरी पर्यावरणासह आपले आयुष्य उद्ध्वस्थ करणाऱ्या या बंदराला सर्वस्तरावरून प्रखर विरोध होतो आहे.
नांदगाव-आलेवाडी येथील जिंदाल समूहाच्या जेट्टी उभारणी मुळेही इथली निसर्ग संपदा आणि मत्स्य संवर्धनाचा हा गोल्डन बेल्ट नष्ट होणार आहे. या दोन्ही महाकाय प्रकल्पांमुळे होणारी प्रचंड हानी पाहता दिवसेंदिवस या विरोधात जनक्षोभ वाढत चालला आहे. तो शांत करण्यासाठी जेएनपीटी चे काही अधिकारी विकासाच्या आणि रोजगार निर्माण करण्याच्या नावा खाली विविध आमिषे स्थानिकांना दाखवीत असल्याचे निदर्शनास आले आहे. आम्ही आपल्या भागाचा विकास साधणार असून शाळा, मैदाने, रोजगार याबाबत विविध आमिषे दाखविली जात आहेत. त्यामुळेच डहाणू, पालघर तालुक्यातील ग्रामस्थ बैठकींना गैरहजर राहत आहेत. कारण अणुऊर्जा प्रकल्प, तारापूर एमआयडीसी उभारतांना स्थानिकांनी आपल्या जमिनी शासनाच्या हवाली केल्या. परंतु सरकारने कोणतेही आश्वासन पाळले नाही, भरपाई दिली नाही. त्यामुळे त्यांची वाताहत झाल्याने इथल्या स्थानिकांच्या मनात शासनाप्रति आता तसूभरही विश्वास उरलेला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चेला साफ विरोध दर्शविला असल्याचे वरोरच्या नारायण विंदे ह्यांनी सांगितले.
समुद्रातील सर्वेक्षणासह इतर कामाला मच्छीमारांच्या बोटी भाड्याने घेणे, समुद्रातील सर्वेक्षण, माती-खडक परीक्षण ह्याचे काँट्रॅक्ट देऊन मच्छीमारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.काही स्थानिक, राजकीय प्रतिनिधी, मच्छिमार नेते आदींना जेएनपीटी बंदराची वारी घडवून त्यांची फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये बडदास्त ठेवत आहेत. त्याद्वारे मच्छिमारांच्या एकजुटीला तोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याने लोकांमधून संताप व्यक्त होतो आहे. तारापूर एमआयडीसीच्या नवापूर गावातून व समुद्रातून जाणाऱ्या प्रदूषित पाण्याच्या ८.१ किमी लांब पाईप लाईनला वाढता विरोध असतांनाही त्याच गावातील काही मच्छीमारांच्या बोटीं सर्वेक्षणासाठी भाड्याने घेऊन तर काहींना विविध आमिषे दाखवून हा विरोध मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर सातपाटी येथील काही मच्छिमार नेत्यांच्या बोटींचा वापरही ओएनजीसी सर्वेक्षणासाठी करीत असल्याचे दिसून येत आहे.
वाढवणं बंदरा विरोधात दिवसेंदिवस जनक्षोभ वाढत असून स्थानिका मधून मोटार सायकल रॅलीद्वारे जनजागृती करुन जनमत तयार केले जात आहे. अशावेळी चिंचणी-दांडेपाडा येथील एका मच्छीमाराने आपल्या बोटी वाढवणं बंदराच्या सर्वेक्षण आणि अन्य परीक्षणासाठी भाड्याने दिल्याची माहिती कळल्या नंतर वाढवणं बंदर विरोधी कृती समिती अध्यक्ष नारायण पाटील, वैभव वझे यासह शेकडो स्थानिकांनी दांडेपाड्यातील प्रभाकर धानमेहेर यांच्या घरी जाऊन सर्वेक्षणा ला सहकार्य न करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी माझे मोठे आर्थिक नुकसान होण्याचे कारण देत या बोटींचा वापर थांबविण्यास नकार दिल्याने किनारपट्टीवरील गावात संतप्त वातावरण पसरले आहे. त्यामुळे काल वाढवणं, वरोर, चिंचणी, डहाणू ई. भागातील स्थानिकांनी भीक मांगो आंदोलन उभारून जमलेला पैसा धानमेहेर यांना देऊन सर्वेक्षण थांबविण्याची विनंती केली जाणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
>ही कीड वेळीच ठेचा
सामाजिक-संघटनात्मक आंदोलनाच्या एकजुटीला लागलेली ही कीड वेळीच ठेचली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात सगळ्यांनाच भोगावे लागतील म्हणून आताच आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे, अशी भावना या परीसरात व्यक्त केली जात आहे.
सर्वेक्षणासाठी नौका पुरविण्याचे मला मिळालेले काँट्रॅक्ट मला कुणी येऊन काही सांगितले म्हणून मी रद्द करणार नाही. माझ्या मनाला गोष्टी पटल्या तरच मी तसा वागेन, माझा फायदा तोटा मला कळतो.
-प्रभाकर धानमेहेर

Web Title: Anti-protesters protests?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.