अण्णा हजारेंना झेड प्लस सुरक्षा

By Admin | Updated: August 21, 2015 10:31 IST2015-08-21T09:51:22+5:302015-08-21T10:31:05+5:30

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दुस-यांदा धमकीचे पत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुुरक्षा वाढवण्यात आली असून त्यांना 'झेड प्लस' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

Anna Hazarena Z-Plus Security | अण्णा हजारेंना झेड प्लस सुरक्षा

अण्णा हजारेंना झेड प्लस सुरक्षा

>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २१ - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दुस-यांदा धमकीचे पत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुुरक्षा वाढवण्यात आली असून त्यांना  'झेड प्लस' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. गुरूवारी अण्णांना जीवे मारण्याच्या धमकीचे आणखी एक पत्र आले होते. 'मी शार्पशूटर असून तुमची सुपारी घेतली आहे' अशा आशयाची धमकी या पत्रातून देण्यात आली असून त्याबाबत पारनेर पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. 
अण्णा हजारे यांच्या रालेगण येथील कार्यालयाला मिळालेले हे पत्र हिंदीत असून धमकी देणा-याने पत्रावर स्वत:चे छायाचित्रही दिले आहे. महादेव पांचाळ या नावानिशी पाठवलेल्या या पत्रावर लातूर जिल्ह्यातील दिंडेगावचा पत्ता असून उस्मानाबाद कार्यालयातून ते पोस्ट झाल्याचे शिक्क्यावरून स्पष्ट होत आहे. 'हे माझे दुसरे पत्र आहे. काही दिवसात आपण माझ्या हातून सुटणार नाही, कारण मी तुमची सुपारी घेतली आहे' असा मजकूर पत्रात आहे. 
हजारे यांना याच (ऑगस्ट) महिन्याच्या सुरूवातीलाच असे एक धमकीचे पत्र मिळाले होते, दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यापासून दूर रहा अन्यथा तुमचा दाभोलकर करू, अशी धमकी अण्णांना देण्यात आली होती. इंग्रजीत लिहीण्यात आलेल्या या पत्रात ७ ऑगस्टची तारीख असून केजरीवाल यांच्यासोबत राहू नका, नाहीतर झटका दाखवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. अण्णांचे वकील मिलिंद पवार यांनी अण्णांना झेड प्लस सुरक्षा मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर आता पुन्हा अण्णांना धमकी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

Web Title: Anna Hazarena Z-Plus Security