Anjali Damania News: या वाल्मिक कराडला शासकीय अंगरक्षक होता? कोणामुळे दिला गेला अंगरक्षक? अशा माणसांची सुरक्षा आमच्या कराच्या पैशातून होणार? हा माणूस मुख्यमंत्री लाडकी योजनेचा अध्यक्ष? कोणी केला ह्यांना अध्यक्ष? धनंजय मुंडे यांच्या आशिर्वादाने ना? मग कधी राजीनामा घेणार त्यांचा? असे अनेक गंभीर FIR पण कारवाई केली गेली नाही? का? असे एकामागून एक सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केले आहेत.
खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले आहे. कराडवर मकोका लावल्याचे समजताच परळीत समर्थकांनी आंदोलन केले. अनेक ठिकाणी जाळपोळ व बसवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे तणावाचे वातावरण होते. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण विरोधकांनी चांगलेच लावून धरले आहे. यातच वाल्मीक कराडच्या समर्थकही आता मैदानात उतरले आहेत. या प्रकरणी अंजली दमानिया सातत्याने महायुती सरकावर टीका करून या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.
घरगडी माणसाकडे इतकी प्रॉपर्टी कशी, ED चौकशी करा
वाल्मीक कराड याच्याकडे इतका अफाट पैसा कुठून आला? काही दिवसांपूर्वी त्याने एक वाइन शॉप आणि त्याची दुकान आणि जमीन ही एक कोटी ६९ लाखाला विकत घेतल्याची माहिती दिली होती. तसेच मंजिरी कराड यांच्या नावावर ज्या गाड्या आहेत त्या ट्विट केले होत्या. त्यांच्या मुलाकडे असलेल्या मोठ्या गाड्यांमध्ये डिफेंडर, वोल्वो असो बीएमडब्ल्यू असो इतक्या महागड्या गाड्या कशा आल्या? त्यांचा काय उद्योग आहे? वाल्मीक कराड धनंजय मुंडे यांच्याकडे साधे काम करत होता. गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे घरगडी म्हणून काम करत होता. या माणसाकडे इतकी अफाट प्रॉपर्टी कशी आली? त्याची चौकशी व्हायला हवी? या प्रकरणाची ईडी चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी दिली आहे. याबाबत टीव्ही९ने वृत्त दिले आहे
दरम्यान, वाल्मीक कराडवर एकूण १४ एफआयआर आहे. पैकी १० परळीमध्ये दाखल आहे. त्यात ३ जुलैच्या एफआयआर मध्ये कलम ३६० म्हणजे जीवे मारण्याची धमकी देणे, ३२३ म्हणजे कोणाला दुखापत पोचवणे, ३२६ म्हणजे धोकादायक शस्त्रांचा वापर करणे, असे गंभीर गुन्हे होते. त्यानंतरही त्याला शासकीय बॉडीगार्ड कसा दिला गेला? अशी विचारणा दमानिया यांनी केली.