मुंबई : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजुरी दिली.प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री तर पर्यावरण मंत्री उपाध्यक्ष असणार आहेत. यासोबतच पर्यावरण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती कार्यरत राहील. या राज्यस्तरीय समितीमध्ये तांत्रिक तज्ज्ञ, वित्तीय व कायदेशीर सल्लागार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव तसेच आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांतील तज्ज्ञ सदस्य यांचा समावेश असेल. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली.या बैठकीला पर्यावरण आणि हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, वातावरणीय बदल कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे तसेच सल्लागार संस्थेच्या नमिता रेपे उपस्थित होत्या. प्राधिकरणाच्या रचना व संकल्पनेचे पंकजा मुंडे यांनी सादरीकरण केले. नद्यांचे पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण व्यापक काम करणार आहे. दैनंदिन कामकाजासाठी एमपीसीबीचे सदस्य सचिव प्रमुख असलेले एक समर्पित सचिवालयही स्थापन केले जाणार आहे.
राज्यात नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:34 IST