ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही तर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही, असे वक्तव्य शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भर सभेत केले होते. यावरून ठाकरे गटाने कोल्हेंना ते हवेवर निवडून येणारे खासदार असल्याचे म्हटले आहे.
राज्याची सध्याची परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही. त्यासोबत पराभवानंतर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत, आता आपल्याला लढायला संधी आहे. सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे. त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे असं विधान त्यांनी पक्षातील आढावा बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर केले होते. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हे यांच्यावर टीका केली आहे.
जाग यावी असे कोण म्हणाले मला माहिती नाही. अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत. संघटनेत 20-30 वर्षे झिजावे लागते ते त्यांना माहित नाही. त्यांनी त्याचे मत व्यक्त केले आहे. एखादा पराभव आणि विजय एकाचा नाण्याच्या दोन बाजू आहेत. आघाडीत बिघाडी कुठेही नाही. निवडणूक आली की विजय पराजय होतो, माविआ फुटत नाही. संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत असे दानवे म्हणाले.
वेगवेगळ्या कामानिमित्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटावे लागते. जनतेच्या प्रश्नासाठी आदित्य ठाकरेंनी भेट घेतली यात काही वावगे नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेत अनेक जण आले आणि गेले शिवसेना तळपत राहिली आहे. त्यामुळे कोणी आले गेले यांने फरक पडत नाही. एकटे मुख्यमंत्री सांभाळू शकत नाही, त्यांना जनतेची साथ लागते अशी शरद पवार यांची भूमिका असेल तर ती सगळ्यांची भूमिका असेल, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
विरोधक दिसत नाहीत असे नाही. बीड प्रकरणात सगळ्यात आधी विरोधकांनी भूमिका मांडली. विरोधीपक्ष सगळ्या प्रश्नावर बोलत आहेत. बीड प्रकरणात सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आमचा आरोप आहे. वाल्मिक कराड याचा या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग आहे. त्याला पाठीशी घातले जात आहे, अशी टीका दानवे यांनी केली.