मुंबई : बहुचर्चित सरोबुद्दीन शेख व त्याची कस्तुरी बी यांच्या बनावट एन्काउंटर प्रकरणातून दोषमुक्त करा, या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अर्जावरील निर्णय विशेष न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला़गुजरात येथे २००५ मध्ये हा एन्काउंटर झाला़ त्यानंतर या एन्काउंटरचा प्रमुख साक्षीदार तुलसीराम प्रजापती याचाही एन्काउंटर झाला़ यात अमित शहा व गुजरात पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा ठपका ठेवत सीबीआयने याचे आरोपपत्रही दाखल केले़ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला सुनावणीसाठी मुंबईत वर्ग करण्यात आला़विशेष न्यायालयात याची सुनावणी सुरू असताना या प्रकरणातून दोषमुक्त करण्याचा अर्ज शहा यांनी केला़ गुजरातचा गृहमंत्री असताना नागरिकांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी माझी होती़ त्या हेतूने मी सतत पोलिसांच्या संपर्कात असायचो़ मात्र या एन्काउंटरशी माझा काहीही संबंध नाही़ राजकीय वैमनस्यातून मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे़ तेव्हा या प्रकरणातून दोषमुक्त करा, अशी विनंती शहा यांनी अर्जात केली आहे़ याला सरोबुद्दीन याचा भाऊ रूबाबुद्दीन याने अर्ज करून शहा यांच्या विनंतीला विरोध केला आहे़ या खटल्याची सुनावणी सुरू असताना त्यांना या प्रकरणातून दोषमुक्त करणे योग्य ठरणार नाही़ सीबीआयने देखील शहा यांच्या अर्जाला विरोध केला आहे़ या एन्काउंटरच्या कटात शहा हे सहभागी होते याचे पुरावे असल्याचा दावा सीबीआयने केला आहे़ मंगळवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने यावर ३० डिसेंबरला निर्णय दिला जाईल, असे जाहीर केले़ (प्रतिनिधी)
अमित शहांचा फैसला ३० डिसेंबरला
By admin | Updated: December 17, 2014 05:10 IST