ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. ९ - १०० दिवसांत अच्छे दिन आणू असे आश्वासन भाजपाने दिले, पण आता कुठे गेले अच्छे दिन असा सवाल उपस्थित करत हल्ली 'थापा'ला पर्याय शब्द म्हणून भाजपाचा वापर केला जातो अशी घणाघाती टीका करत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
शुक्रवारी राज ठाकरे यांनी कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी नरेंद्र मोदी, भाजपावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेंडीची भाजी आहे असे सांगत राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्रींची खिल्ली उडवली. निवडणूक तोंडावर येताच पॅकेज वाटतात, पण मग वर्षभरापूर्वीच का पॅकेज जाहीर केले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपाला उमेदवार मिळत नसल्याने ते आशेपोटी दुस-या पक्षांकडे बघतात, विधानसभेपाठोपाठ कल्याण डोंबिवलीतही भाजपाने तेच केले असून नशीब बराक ओबामांकडे भाजपाने उमेदवार मागितले नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवसेना - भाजपा हे फक्त टेंडरपुरते एकत्र आले असून कल्याण डोंबिवलीची धूळधाण त्यांनी केली आहे असे टीकास्त्रही त्यांनी सोडले आहे. शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते जातीपातीचे राजकारण करत आहे. शरद पवारांना फडवणवीस नको होते तर त्यांनी मोदींना सांगायला पाहिजे होते असेही राज ठाकरेंनी नमूद केले. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याऐवजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करा असेही त्यांनी म्हटले आहे.