नवी मुंबई : गुरू आणि शिष्याचे नाते अतूट असते आणि ते शेवटपर्यंत टिकते. याच नात्याला आणखीन फुलविण्यासाठी लोकमत माध्यम प्रायोजक आणि ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयांवर आधारित पथनाट्य आणि गायन सादर केले. या कार्यक्रमात ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या मधुबन शिशू विहार, ज्ञानदीप विद्यामंदिर, ऐरोली माध्यमिक विद्यालय, चार्टड इंग्लिश स्कूल यांचा सहभाग होता. पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील शिस्त,आदर्श विद्यार्थी, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये असलेले नाते, ़शिक्षणाचे महत्त्व, फायदे आदी विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. अभिनेत्री मनीषा केळकर हिची विशेष उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असल्याचे मनीषाने स्पष्ट केले. >शिक्षकांचाही केला सन्मानशिक्षकांचा सन्मान सोहळा हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांना भेटवस्तू दिली. विद्यार्थ्यांनी भाषणाच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपाध्यक्षा गौरी मोकाशी, शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम नांदगुडे, विद्या ठाकूर,भारती रुळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थेच्या चार शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
ऐरोलीत गुरुपौर्णिमा महोत्सव
By admin | Updated: July 20, 2016 02:56 IST