मुंबई - १९ डिसेंबरला देशात राजकीय स्फोट होईल अन् मराठी माणूस पंतप्रधान बनेल असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केला. चव्हाण यांच्या दाव्यानंतर १९ डिसेंबरला काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले. मात्र यातच एका बड्या उद्योजकाने देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान म्हणून उल्लेख केल्याने अनेकांच्या भूवया उंचवल्या. एका कार्यक्रमात उद्योजक सज्जन जिंदाल भाषण करत होते त्यावेळी जिंदाल यांनी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केला त्यामुळे फडणवीसही काही क्षण अवाक् झाले.
भाषणाच्या ओघात सज्जन जिंदाल यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख पंतप्रधान असा केला. परंतु चूक लक्षात आली त्यानंतर जिंदाल यांनी सॉरी म्हणत दुरुस्ती केली. उद्योजक सज्जन जिंदाल यांनी म्हटलं की, पंतप्रधान मला बोलले, आपल्याला ५०० मिलियन टन स्टील बनवायचे आहे. आपल्याला ३०० मिलियन टनवर थांबायचे नाही. आपण चीनपेक्षा कमी नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीत आत्मनिर्भर व्हायचे आहे. आपल्याला जगासाठी स्टील बनवायचे आहे. आपल्या देशात उत्पादन वाढवायचे आहे. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. कारण आज आपण पंतप्रधानांना ऐकायला आलोय...असं त्यांनी म्हटलं. मात्र चूक लक्षात येताच पंतप्रधान शब्द काढून मुख्यमंत्र्यांना ऐकायला आलोय, माझ्याकडून तोंडातून चुकीने शब्द निघाला परंतु एक दिवस ते पंतप्रधान होतील असंही जिंदाल यांनी म्हटलं. त्याशिवाय आपल्या हिंदूंमध्ये असं बोलले जाते, जर एखादा शब्द तोंडातून निघाला असेल तर ते होते. आपल्या जीभेवर सरस्वती विराजमान असते असंही ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?
१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान बदलेल अन् मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवले होते. त्यानंतर आज १९ डिसेंबर रोजी सगळ्यांचे लक्ष अमेरिकेतील एपस्टीन फाईल्सकडे लागले आहे. अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे असं सांगत चव्हाणांनी अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली होती.
योगायोग की अन्य काही...
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलेले भाकीत आणि एका उद्योजकाच्या तोंडून देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान म्हणून झालेला उल्लेख हा निव्वळ योगायोग आहे की अन्य काही घडणार आहे अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान कोण होतील अशी चर्चा जेव्हा होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचेही नाव घेतले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले देवेंद्र फडणवीस हे नागपूरहून येतात. फडणवीस यांच्या कार्यकाळात भाजपाने महाराष्ट्रात सलग ३ वेळा सत्ता आणली आहे. २०१९ साली महायुतीला जनतेने कौल दिला होता परंतु राजकीय घडामोडीत सर्वाधिक जागा जिंकूनही फडणवीसांना विरोधी बाकांवर बसावे लागले. मात्र त्यानंतर २ वर्षात पुन्हा एकदा भाजपाला सत्तेत आणण्यात फडणवीसांचा मोठा वाटा आहे.
Web Summary : An industrialist's accidental reference to Devendra Fadnavis as Prime Minister sparked speculation, fueled by Prithviraj Chavan's prediction of a political earthquake. This raises questions about potential shifts in national leadership.
Web Summary : एक उद्योगपति द्वारा देवेंद्र फडणवीस को गलती से प्रधानमंत्री कहने से अटकलें तेज हो गईं, जिसे पृथ्वीराज चव्हाण की राजनीतिक भूकंप की भविष्यवाणी ने हवा दी। इससे राष्ट्रीय नेतृत्व में संभावित बदलावों के बारे में सवाल उठते हैं।