जळगाव : शहराजवळच्या आव्हाणे फाट्याजवळ एका मिनी ट्रकने दोन दुचाकींना दिलेल्या जोरदार धडकेत दोन जणांचा जागीच तर तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर जमावाने ट्रक पेटवून दिला तसेच अग्निशमन दलाच्या वाहनावर दगडफेक केली. जमावाने तहसीलदारांना धक्काबुक्की केली तर पोलीस निरीक्षकांची कॉलर पकडण्याचाही प्रकार घडला. अपघातातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. जळगावकडून आलेल्या मिनी ट्रकने आव्हाणे फाट्याजवळ दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील चंपालाल रुपसिंग चौधरी (३३) हे जागीच ठार झाले तर कैलास रुपसिंग चौधरी (३५) जखमी झाले. त्याचवेळी ट्रकने चौधरी बंधूंच्या मागून येणाऱ्या दुचाकीला फरफटत नेले. त्यात शेख फिरोज अब्दुल गनी पिंजारी (२७) व शेख मुक्तार शेख मेहमूद (१८) हे जागीच ठार झाले. तर शेख शरीफ शेख अमिरोद्दीन (३५) हे गंभीर जखमी झाले. ट्रकचालकाने तिघांना फरफटत नेले. अपघाताची भीषणता पाहून संतप्त ग्रामस्थांनी मार्गावरील रहदारी रोखली. काहींनी मिनी ट्रकवर पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यानंतर आलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनाच्या काचाही जमावाने फोडल्या. जमाव आक्रमक होत असल्याचे पाहून पोलीस निरीक्षक रामकृष्ण भोसले व तहसीलदार गोविंद शिंदे घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. (प्रतिनिधी)
भीषण अपघातानंतर जमावाने ट्रक पेटविला
By admin | Updated: January 2, 2015 01:31 IST