ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - बॉलिवूड दबंग सलमान खानच्या घरासमोरील सार्वजनिक शौचालय हटवण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनी आपल्या घरासमोरील सार्वजनिक टॉयलेट हटवण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यांनी महापौरांना यासंबंधी पत्र लिहिलं होतं. घरासमोरील सार्वजनिक टॉयलेटमुळे गैरसोय होत असल्याने ते हलवण्यात यावे, असं कारण सलीम खान यांनी महापौरांना दिलं होतं. मात्र प्रशासनाने त्यांची ही मागणी फेटाळून लावत स्पष्ट नकार दिला आहे. शौचालय स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेतली जाईल, मात्र ते अन्यत्र हलवली जाणार नाही, असं उत्तर प्रशासनाकडून महापौरांना पाठवलं जाणार आहे.
विशेष म्हणजे हागणदारीमुक्त स्वच्छ मुंबई या योजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या सलमान खानच्या कुटुंबाकडूनच अशा प्रकारे शौचालयाला विरोध होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ज्या योजनेसाठी मोठ्या अभिमानानं सलमानची ब्रॅण्ड अॅम्बेसिडरपदी निवड करण्यात आली होती त्याच योजनेसाठी खान कुटुंबियाकडून नाकं मुरडली जात आहेत.
स्वच्छ मुंबईच्या उपक्रमाअंतर्गत सलमान खानच्या घराजवळील परिसरात म्हणजेच वांद्रे बॅण्डस्टॅण्डजवळ सार्वजनिक शौचालयं बांधण्यात येत आहे. पण, याला आता सलमानच्याच कुटुंबियांनी हरकत घेतली आहे. सलमानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान, अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी सार्वजनिक शौचालयं त्यांच्या घराजवळील परिसरात बांधू नयेत, अशी मागणी केली आहे.
सलीम खान यांच्या पत्राची दखल घेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एच पश्चिमचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांना पत्र लिहून या संदर्भात कार्यवाही करण्यासंबंधी सुचवलं होतं. मात्र मुतारी सुरुही झाली नसताना केवळ दुर्गंधीच्या शक्यतेने रहिवासी त्याला विरोध करत असल्याचं पालिकेच्या अधिका-यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, याविषयी प्रसारमाध्यमांसमोर सलीम खान यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. ‘शौचालयं उभारण्यासाठी आमचा काहीच विरोध नाही. उलटपक्षी आमचा या उपक्रमाला पाठिंबाच आहे. पण, लोकांची वर्दळ असणाऱ्या अशा मोक्याच्या ठिकाणी शौचालय उभारणं योग्य नाही.’ असं सलीम खान म्हणाले होते.