डहाणू : यावर्षी देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यातील आदिवासी मुला, मुलींना शुभेच्छा देऊन विविध शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत पाठविण्यात आले. गेल्या चार, पाच दिवसांत पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थी आराम बसने रवाना झाले. तर काही उर्वरित विद्यार्थी लवकरच रवाना होणार असून त्यांचा सर्व खर्च शासनातर्फे केला जाणार आहे. आदिवासी समाजाचा सर्वांगिण विकासाचा पाया भक्कम व्हावा. ही काळाची गरज असून ती गरज शिक्षणाने पुर्ण होऊ शकते. शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून देऊन शिक्षणानेच आदिवासी समाजाची प्रगती होऊ शकते. हे ओळखून शासनाने आदिवासी मुला मुलींना अगदी मोफत निवासी शिक्षण मिळावे या उदान्त हेतूने सन १९७५ ला डहाणू, तलासरी, पालघर, वसई सारख्या आदिवासी बहुल भागात एकात्मिक आदिवासी विकासामार्फत आश्रमशाळा तसेच निवासी वसतीगृहे सुरू केलीत. डहाणू प्रकल्पाअंतर्गत एकू ण ३३ आश्रम शाळा, १९ वस्तीगृह तसेच २१ अनुदानित आश्रमशाळा आहे. सुमारे पंचवीस हजार आदिवासी विद्यार्थी तसेच विद्यार्थीनींना निवासी शिक्षण घेत असतात. समाजातील इतर विद्यार्थ्यांबरोबरच आदिवासी समाजातील मुला-मुलींना देखील लहानपणापासूनच इंग्रजी शिकता यावे म्हणून शासनाने सन २००९ पासून इंग्रजी शाळेत आदिवसीं विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची योजना सुरू केली.दरम्यान गेल्या वर्षी विविध नामांकित इंग्रजी शाळेत एकूण ६५० विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यात आले होते.सन २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षात सातारा, पाचगणी, ब्रम्हवेळी, कल्याण, वाडा, शहापूर, बेल्हे येथील नामांकित शाळेत एकूण एक हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यातील उर्वरित विद्यार्थी लवकरच रवाना होतील. (वार्ताहर)
आदिवासी विद्यार्थी निघाले कॉन्व्हेंटमध्ये
By admin | Updated: July 4, 2016 03:53 IST