Shiv Sena Aditya Thackeray: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विधिमंडळात आणि बाहेरही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधी पक्षाकडून सत्ताधारी महायुतीवर विविध मुद्द्यांवरून हल्लाबोल केला जात असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
"आज विधानसभेत उपमुख्यमंत्री मिंधे यांनी स्वतःला उत्तरं द्यावी लागू नयेत म्हणून किंवा लोकप्रतिनिधींचा जाणूनबुजून अपमान करायचा म्हणून, स्वतःकडील खात्यांच्या उत्तरांची जबाबदारी घाईघाईने इतर मंत्र्यांवर सोपवली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना किंवा आता मुख्यमंत्री असतानाही स्वतः प्रश्नोत्तरांना उभे राहतात. अजित पवारही स्वतः प्रश्नांची उत्तरे देतात, पण काहींकडे मात्र उत्तरंच नसल्याने किंवा लोकप्रतिनिधींना तोंड देण्याची क्षमताच नसल्याने स्वतःवरची जबाबदारी झटकण्याची वेळ आली आहे," असा टोला आदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून लगावला आहे.
एकनाथ शिंदेंवर टीका करताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, "मिंधे नाकर्ते आहेत हे वारंवार सिद्ध झालंच होतं, आज पुन्हा एकदा त्यावर शिक्कामोर्तब झालं. माझा सवाल मुख्यमंत्र्यांना आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना आहे की अशा विधिमंडळाचा, लोकप्रतिनिधींचा अपमान करणाऱ्या अकार्यक्षम व्यक्तीसोबत बाकांवर बसणं कसं सहन होतं? पण... ज्या राज्यात बलात्कार शांततेत पार पडला- अशा प्रकारचे भयंकर उद्गार काढणाऱ्या मंत्र्यांना पदावरुन काढून न टाकता अभय दिले जाते, त्या मंत्रिमंडळाकडून जनता काय अपेक्षा ठेवणार? सक्षम मंत्रिमंडळ असते तर तातडीने अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली असती," अशा भावनाही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केल्या आहेत.