नवी मुंबई : ‘तनू वेड्स मनू’, ‘रांझणा’ या सिनेमांमधील अभिनेत्री स्वरा भास्कर सायबर गुन्ह्याची बळी ठरली आहे. स्वराने नवी मुंबईतील एका मॉलमध्ये एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. काही वेळाने अकाउंटमधून २० हजार रुपये काढल्याचा मेसेज तिच्या फोनवर आला. एटीएम पिन एंटर न करताच खात्यावरील पैसे गायब झाल्याने तिला धक्का बसला.स्वरा सध्या आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे शूटिंग कर्जतमध्ये सुरू आहे. शूटिंग संपल्यानंतर ती हॉटेलला परतत होती. खारघरमधील एका मॉलमधील एटीएममधून पैसे काढण्यासाठी ती थांबली. एटीएम फार स्लो होते आणि तिथेच असलेल्या दोन व्यक्तींनी तिला सांगितले की, एटीएम व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे पैसे न काढताच ती तिथून निघून गेली. मात्र कारजवळ पोहोचताच तिला मेसेज आला की, अकाउंटमधून २० हजार रुपये काढण्यात आले आहेत. एटीएम पिन टाईप न करताच पैसे काढल्याने तिला धक्काच बसला. स्वरा भास्करने खारघर पोलीस ठाण्यात या प्रकाराची तक्रार दाखल केली आहे. (प्र्रतिनिधी)
अभिनेत्री स्वरा भास्करची फसवणूक
By admin | Updated: September 4, 2015 01:04 IST