मुंबई : महापालिकेच्या जी-दक्षिण विभागांतर्गत येणाऱ्या जे. आर. बोरीचा मार्गावरील १४८ अनधिकृत झोपड्या तोडण्यात आल्या. पदपथावर असणाऱ्या या अनधिकृत झोपड्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालत जावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जसा रस्त्यावरील रहदारीचा त्रास होत होता, तसाच रस्त्यावरील रहदारीला व वाहतुकीला पादचाऱ्यांचा त्रास जाणवत होता. मात्र कारवाईमुळे पायी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोकळा पदपथ मिळण्यासोबतच रस्त्यावरील वाहतूक सुलभ होण्यास मदत झाली आहे.चिंचपोकळी स्टेशन ते संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता चौक) यांना जोडणाऱ्या साने गुरुजी मार्गावर आॅर्थर रोड कारागृह परिसराजवळ जे. आर. बोरीचा मार्ग आहे. या मार्गावर सीताराम मिल स्कूल ही शाळा व बीडीडी चाळी आहेत. याच जे. आर. बोरीचा मार्गाच्या पदपथावर असणाऱ्या १४८ अनधिकृत झोपड्या तोडण्यात आल्या आहेत. जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वाखाली आणि ना.म. जोशी पोलीसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)>खार व सांताक्रुझमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईमहापालिकेच्या एच-पश्चिम विभागांतर्गत येणाऱ्या खार व सांताक्रुझ परिसरातील व्यावसायिक स्वरूपाची अनधिकृत बांधकामे महापालिकेने जमीनदोस्त केली. विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या नेतृत्वाखाली खार व सांताक्रुझ पोलीस स्टेशनच्या ३५ जणांच्या चमूने ही कारवाई केली.खार व सांताक्रुझ परिसरात विविध व्यावसायिक स्वरूपाची अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत. यामध्ये जुहू तारा रस्त्यावरील थ्री वाइज मेन, लिंकिंग रोडवरील ए-वन फालूदा हटविण्यात आले आहे. तसेच १५व्या रस्त्याजवळील खार जिमखान्यानजीकच्या पदपथावर असणारे स्टॉल्स पूर्णपणे हटविण्यात आल्याने पदपथ मोकळे होण्यास मदत झाली आहे. तसेच खार स्टेशनच्या पश्चिम बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांना अडसर ठरणारे तीन अनधिकृत स्टॉल्स तोडण्यात आले आहेत. अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई करणाऱ्या चमूमध्ये संबंधित खात्यातील कामगार, कर्मचारी, अभियंता व अधिकारी यांचा समावेश होता. ही कारवाई पूर्ण करण्यासाठी जेसीबी मशीनसह ४ डम्पर वापरण्यात आले.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई
By admin | Updated: July 4, 2016 02:36 IST