निरवांगी : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अवैध वाळूउपशावर इंदापूर, माळशिरस महसूल प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. निमसाखर, निरवांगी, खोरोची, कळंब येथील नीरा नदीच्या पात्रातील वाळू जेसीबी यंत्राच्या साहाय्याने उपसली जात होती. गुरुवारी (दि. ९) माळशिरस महसूल खात्याकडून कारवाई झाली, तर १० जूनला इंदापूर महसूल खात्याकडून कारवाई झाली. कारवाईमुळे निमसाखर या ठिकाणच्या नीरा नदीच्या पात्रात दररोज असणारे जेसीबी यंत्र सध्या दिसत नाही. त्यामुळे नदी परिसर शांत असल्याचे दिसून आले. निमसाखर, निरवांगी, खोरोची, कळंब, रासकरमळा या ठिकाणच्या नीरा नदीच्या पात्रात दिवसरात्र वाळूउपसा होत होता. परंतु, याबाबत इंदापूर महसूल खात्याकडून दुर्लक्ष होते. परिसरातील शेतकरी व नागरिक प्रवासी नाराज होते. निमसाखर, निरवांगी, रासकरमळा, खोरोची या भागांत नीरा नदीच्या पात्रात मोठे खड्डे पडलेले असल्याचे दिसून येत आहे. निमसाखर येथे पावसाळा दिवसांत होडीची वाहतूक होत असते. ज्या ठिकाणी होडीची वाहतूक होती, त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे होडी वाहतूक पूर्णपणे धोक्याचे होणार आहे. इंदापूरचे तहसीलदार वर्षा लांडगे यांनी महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत निमसाखर या ठिकाणच्या नीरा नदीच्या पात्रात कारवाई केली. यामध्ये माळशिरस महसूल आणि इंदापूर महसूल खात्याने एक, अशी दोन जेसीबी यंत्रे ताब्यात घेतली.> दोन दिवस कारवाई होत असल्याने दिवसरात्र वाळूचा होत असलेला उपसा मात्र शनिवारी बंद होता. यंत्राचा आवाज येत नसल्याने नीरा नदीचा परिसर मात्र शांत होता. अशीच कारवाई यापुढेही करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
इंदापूरच्या पश्चिम भागात वाळूउपशावर कारवाई
By admin | Updated: June 13, 2016 01:50 IST